मुंबई : नवोदित अभिनेत्रीला बेवसिरीजमध्ये काम देण्याचे आमिष दाखवून आर्थिक फसवणूक करून, अश्लील छायाचित्रांच्या आधारे खंडणी मागितल्याचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी अंधेरीमधील डी. एन. नगर पोलिसांनी दोघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

फिर्यादी तरूणी १८ वर्षांची असून अभियांत्रिकी महाविद्यालयात शिक्षण घेत आहे. तिला अभिनय आणि मॉडेलिंग क्षेत्रात करियर करायचे आहे. त्यासाठी ती प्रयत्न करीत होती. तिला ११ जून रोजी भावेश नामक एका व्यक्तीचा फोन आला. मी जी एम स्टुडियोमधील निर्माता असून एक बेवसिरीजसाठी अभिनेत्रीचा शोध घेत असल्याचे त्याने सांगितले. या बेवसिरीजचे दिग्दर्शक राहुल पटेल दिग्दर्शक, तर शिवम अग्रवाल मुख्य भूमिकेत असल्याची माहिती त्याने दिली.

फिर्यादी तरूणीने त्याला आपल्या इन्स्टाग्राम आयडी, युट्यूबची लिंक पाठवली, तसेच यापूर्वी केलेल्या कामाचे व्हिडियो पाठवले. ते पाहून त्याने लगेच तिला बेवसिरीजमध्ये मुख्य भूमिकेसाठी निवड केल्याचे सांगितले. यासाठी विमान तिकिट, नोंदणी आदी कामांसाठी तिच्याकडून ९ हजार ८०० रुपये घेतले. बेवसिरीजचे कथानक आणि इतर माहिती दिली. त्यामुळे तिचा विश्वास बसला.

या बेवसिरीजमध्ये शिवम अग्रवाल हा मुख्य भूमिका करणार असून पुढील दोन दिवसांत चित्रिकरणाला सुरवात होईल, असे तिला सांगण्यात आले. बेवसिरीजमध्ये एकत्र काम करायचे असल्याने ओळख वाढविण्यासाठी भावेशने फिर्यादीला शिवम अग्रवालसोबत चित्रपट पाहण्यासाठी जाण्यास आणि एकत्र वेळ घालविण्यास सांगितले. त्यानुसार १३ जून रोजी फिर्यादी शिवम अग्रवाल नामक इसमासोबत नरिमन पॉईट येथील एका सिनेमागृहात चित्रपट पाहून आली. त्यानंतर मात्र त्या दोघांनी फिर्यादीला तिची संपादीत (एडीट) केलेली अश्लील छायाचित्र पाठवून ती वायरल करण्याची धमकी दिली. त्यासाठी तिच्याकडे ४० हजार रुपयांची खंडणी मागितली. त्यामुळे तिने त्यांचे नंबर ब्लॉक केले. परंतु आरोपी तिच्या बहिणीच्या मोबाइलवर फोन करून तिला धमकावू लागले. अखेर तिने याप्रकरणी डी. एन. नगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. अवघ्या सात दिवसांत हा फसवणुकीचा प्रकार घडला.

या प्रकरणी डी. एन. नगर पोलिसांनी आरोपी भावेश, शिवम अग्रवाल, तसेच दोन अनोळखी मोबाइल क्रमांकधारकांविरोधात माहिती तंत्रज्ञान अधिनियमाच्या कलम ६७, ६६ (क) ६६ (ड), तसेच फसवणूक आणि धमकावल्याप्रकरणी कलम ३१८, ३१९, ३५१ अन्वये गुन्हे दाखल केले आहेत. याप्रकरणी डी. एन. नगर पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

चित्रपटात काम करण्यासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून तरुण – तरुणी येत असतात. त्यांची वेगवेगळ्या प्रकारे फसवणूक होत असते. त्यामुळे तरुणींनी कुठलाही व्यवहार करताना संबंधित कंपनीची माहिती घ्यावी, सत्यता पडताळून पहावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.