मुंबई : प्रत्येक रुग्णालयामध्ये श्वानदंश होणाऱ्या रुग्णाला आवश्यक इंजेक्शनचा साठा उपलब्ध करण्याचा दावा मुंबई महानगरपालिकेकडून करण्यात येत आहे. मात्र मागील काही दिवसांपासून सातत्याने वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या कूपर रुग्णालयामध्ये श्वानदंशावरील इंजेक्शनच उपलब्ध नसल्याने रुग्णांना अन्य रुग्णालयांमध्ये धावपळ करावी लागत आहे.
कूपर रुग्णालयमध्ये उंदराने रुग्णांना चावा घेतल्याची घटना ताजी असतानाच श्वानदंश झाल्याने अंधेरीमधील रहिवासी ३३ वर्षीय महिलेला रुग्णालयामध्ये सकाळी ८.३० वाजताच्या सुमारास उपचारासाठी नेण्यात आले. रुग्णालयातील डॉक्टरांनी त्या महिलेची तपासणी करून तिला धनुर्वाताचे इंजेक्शन दिले. तसेच श्वानदंश झाल्यावर एआरव्ही आणि एचआरआयजी ही दोन इंजेक्शन्स देणे गरजेचे असते. मात्र कूपर रुग्णालयामध्ये ही दोन्ही इंजेक्शन्स उपलब्ध नसल्याने या महिलेला ती औषधाच्या दुकानातून खरेदी करून आणण्यास सांगण्यात आले. मात्र यातील एआरव्ही हे इंजेक्शन ६०० रुपये, तर एचआरआयजी हे इंजेक्शन सात हजार रुपयांना मिळत असल्याने दोन्ही इंजेक्शन खरेदी करणे या महिलेच्या आवाक्या बाहेर होते. त्यामुळे तिने स्वत: दरामध्ये कोठे इंजेक्शन उपलब्ध होते का यासाठी प्रयत्न केले.
आसपासच्या परिसरातील सर्व औषधांच्या दुकानांमध्ये फिरल्यानंतरही तिला ही इंजेक्शन्स स्वस्त दरामध्ये उपलब्ध झाली नाहीत. श्वानदंश झाल्यामुळे अनेक जण कूपर रुग्णालयामध्ये उपचारासाठी येतात. मागील काही दिवसांपासून कूपर रुग्णालयात श्वानदंशावरील इंजेक्शन उपलब्ध नसल्याने येथे उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांना खासगी किंवा केईएम, नायर व जे.जे. या रुग्णालयांमध्ये धाव घ्यावी लागत आहे. यामुळे रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागत आहे.
वैद्यकीय शिक्षण व प्रमुख रुग्णालयाच्या संचालक डॉ. नीलम अंद्राडे यांनी जूनमध्ये कूपर रुग्णालयाच्या अधिष्ठाता पदाचा अतिरिक्त पदभार स्वीकारल्यानंतर तीन आठवड्यात ८५० नस्ती मार्गी लावल्याचा दावा केला आहे. असे असतानाही रुग्णालयामध्ये श्वानदंशावरील इंजेक्शनचा तुटवडा का, असा प्रश्न रुग्णालयातील कर्मचाऱ्यांकडून उपस्थित करण्यात येत आहे.
श्वानदंशावरील इंजेक्शन संदर्भात निविदा प्रक्रिया सुरू आहे. ही निविदा प्रक्रिया पूर्ण होताच रुग्णालयामध्ये श्वानदंशावरील इंजेक्शन उपलब्ध होईल. – डॉ. देव शेट्टी, वैद्यकीय अधीक्षक, कूपर रुग्णालय