मुंबई : मालाड पश्चिम येथील सोसायटीमधील उंदीर मारण्यासाठी ठेवलेला विषारी पदार्थ खाऊन कुत्र्याचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी घडली. याप्रकरणी तक्रार प्राप्त होताच मालवणी पोलिसांना सोसायटीमध्ये पेस्ट कंट्रोलचे काम करणाऱ्या व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला. याप्रकरणी मालवणी पोलीस अधिक तपास करीत आहेत. तक्रारदार प्रकाश अयंगार हे मालाड पश्चिम येथील मढ परिसरातील रहिवासी आहेत. ते २०२० ते २०२२ या कालावधीत भूमी पार्क येथील डॉल्फीन टॉवरमधील सदनिकेत राहत होते. त्यावेळी त्यांनी सोसायटीमध्ये चार ते पाच कुत्रे पाळले होते. ते व सोसायटीमधील इतर व्यक्ती मिळून कुत्र्यांची देखभाल करत होते. बुधवारी इमारतीच्या वाहनतळ परिसरात सिम्बा नावाचा कुत्रा बेशुद्धावस्थेत आढळला.

हेही वाचा : आमदार अपात्रता प्रकरण सुनावणी: पहिल्या दिवशी काय घडलं? शिंदे गटाचे वकील म्हणाले…

याबाबतची माहिती मिळताच अयंगार यांनी तात्काळ खासगी रुग्णवाहिका पाठवली आणि त्या कुत्र्याला मालाड येथील डॉ. निलिमा वेटरनिटी क्लिनिकमध्ये नेण्यात आले. तेथे तपासणी केल्यानंतर कुत्र्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्यावेळी अयंगार यांनी चौकशी केली असता सोसायटीमध्ये पेस्ट कंट्रोलचे काम करणारा एलियल गोन्सालविस याने उंदीर मारण्यासाठी विष मिसळलेले खाद्यपदार्थात विविध ठिकाणी ठेवले होते. वाहनतळातील विषारी पदार्थ सिम्बाने खाल्ल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे समजले. त्यानंतर अय्यंगार यांनी तातडीने याप्रकरणी मालवणी पोलिसांकडे तक्रार केली. त्यानुसार पोलिसांनी प्राण्यांचा छळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला. याप्रकरणी अधिक तपास सुरू असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.