मुंबई : रद्द करण्यात आलेल्या विमानाच्या तिकिटाचा परतावा देण्याच्या नावाखाली एका वृध्द महिलेची सायबर भामट्यांनी तब्बल साडेसात लाख रुपयांची फसवणूक केल्याचे उघडकीस आले आहे. या महिलेने गुगलवरून विमान कंपनीचा ग्राहक सेवा क्रमांक मिळवला होता. मात्र बनावट क्रमांकावरील सायबर भामट्याने त्यांना ‘एपीके’ फाईल डाऊनलोड करायला सांगून त्यांच्या बॅंकेतील रक्कम लंपास केली.
तक्रारदार महिला ७७ वर्षांच्या असून त्या पतीसह जुहू येथे राहतात. त्यांचे बॅंक खाते पती आणि मुलीच्या बॅंक खात्याशी संलग्न आहे. मे महिन्यात त्यांनी एका खासगी विमान कंपनीच्या मुंबई – कोईम्बतूर विमानाची दोन तिकिटे आरक्षित केली होती. नंतर त्यांचे तिकिट रद्द करण्यात आले होते. पंरतु त्याचा परतावा त्यांना देण्यात आला नव्हता.
गुगलवरून कंपनीचा क्रमांक शोधला
परतावा मिळविण्यासाठी त्यांनी २६ जून रोजी विमान कंपनीशी संपर्क साधण्यासाठी त्यांचा संपर्क क्रमांक गुगलवर शोधण्याचा प्रयत्न केला. नेमक्या त्या सायबर भामट्यांच्या जाळ्यात अडकल्या. त्यांना एक बनावट संकेतस्थळावर विमान कंपनीचा संपर्क क्रमांक दिसला. त्यांना तो खरा वाटला. तक्रारदार महिलेने त्या क्रमांकावर संपर्क साधला आणि रद्द केलेल्या तिकिटाचा परतावा मागितला. फोनवरील इसमाने त्यांना व्हॉट्स ॲपवर एक ‘एपीके’ फाईल पाठवली आणि बॅंकेचे तपशील घेतले. त्यानंतर त्यांना व्हिडियो कॉल करण्यात आला. काही दिवसांनी बॅंक खात्यात रक्कम जमा होईल, असे त्यांना सांगण्यात आले.
तक्रारदाराच्या बॅंक खात्यातून ४ जुलै रोजी १२ हजार रुपये काढल्याचा संदेश आला. काही वेळाने त्यांच्या पतीच्या खात्यातून ६६ हजार रुपये काढण्यात आले. पाठोपाठ मुलीच्या खात्यातूनही ६ लाख ७३ हजार रुपये काढण्यात आले. अवघ्या १५ मिनिटांत त्यांच्या खात्यातून ७ लाख ५१ हजार रुपये लंपास करण्यात आले. त्यांचे बॅंक खाते संलग्न असल्याने तिन्ही बॅंक खात्यावर सायबर भामट्याने डल्ला मारला. याप्रकरणी तक्रारदार महिलेने सायबर मदत क्रमांकावर संपर्क साधून आपली तक्रार नोंदवली. नंतर जुहू पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात माहिती तंत्रज्ञान अधिनियमाच्या कलम ६६ (क), ६६ (ड), तसेच फसवणूक केल्याप्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या कलम ३१८ (४), ३१८ (२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
‘एपीके’ फाईल धोकादायक
एपीके म्हणजे ॲण्ड्रॉईड पॅकेज किट. ही एक फाईल फॉरमॅट असून ती ॲण्ड्रॉईड ऑपरेटिंग सिस्टमसाठी ॲप्लिकेशन इंस्टॉल करण्यासाठी वापरली जाते. सायबर भामटे व्हॉट्स ॲपवर ‘एपीके’ फाईल पाठवून मोबाइल हॅक करून माहिती चोरतात, असे पोलिसांनी सांगितले. जेव्हा एपीके फाईल अधिकृत गुगल प्ले स्टोअर बाहेरून किंवा अनधिकृत ॲप स्टोअर्स डाउनलोड केली जाते तेव्हा ती फाईल धोकादायक असते. त्यामध्ये मालवेअर, स्पायवेअर किंवा ट्रोजन असू शकतात. काही एपीके फाईल्स डाऊनलोड केल्यास थेट मोबाइलवर नियंत्रण मिळवले जाते. त्याद्वारे वैयक्तिक माहिती, बँक डिटेल्स, छायाचित्रे, ओटीपीची चोरी केली जाते.
सुरक्षिततेसाठी काय करावे ?
फक्त अधिकृत गुगल प्ले स्टोअरवरून ॲप्स डाउनलोड करावे, ‘इन्स्टॉल फ्रॉम अननोन सोर्सेस’ हे सेटिंग शक्यतो बंद ठेवावे, कोणतीही एपीके फाईल डाउनलोड करताना त्या संकेतस्थळाची आणि ॲपची पूर्ण माहिती वाचूनच निर्णय घ्यावा, फोनमध्ये ॲन्टीव्हायरस ठेवावे, असे सायबर तज्ञांनी सांगितले.