मुंबई : परिविक्षा कालावधीमध्ये बेकायदेशीपरणे गैरहजर राहणाऱ्या ५८ वैद्यकीय अधिकाऱ्यांवर सार्वजनिक आरोग्य विभागाने कारवाई केली आहे. सातत्याने गैरहजर राहणाऱ्या या ५८ वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सेवा आरोग्य विभागाने रद्द करण्यासंदर्भात शुक्रवारी सरकारी आदेश जारी केला आहे.
सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत महाराष्ट्र वैद्यकीय आणि आरोग्य सेवा गट – अ मध्ये वैद्यकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात येते. सरकारच्या परिविक्षा धोरणातील सर्व तरतुदी या अधिकाऱ्यांना लागू असतात. सरकारी सेवेत काम करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या परिविक्षा कालावधीबाबत सामान्य प्रशासन विभागाच्या फेब्रुवारी २०१६ च्या शासन निर्णयांतर्गत तरतुदी करण्यात आल्या आहेत. यानुसार, परिविक्षा कालावधीत नैमित्तिक रजा वगळता कोणत्याही प्रकारच्या रजा मंजूर करताना, परिविक्षा कालावधी रजेच्या कालावधीपर्यंत किंवा जास्तीत जास्त एक वर्षासाठी वाढवण्याची तरतूद आहे. परिविक्षा कालावधीत कोणत्याही वैध कारणाशिवाय ७ दिवसांपेक्षा जास्त काळ गैरहजर राहिल्यास उमेदवाराची सेवा समाप्त करण्याची तरतूद आहे.
शुक्रवारी जारी केलेल्या सरकारी आदेशानुसार, ५८ वैद्यकीय अधिकाऱ्यांची सेवा समाप्त करण्यात आली आहे. ते त्याच्या परिविक्षा कालावधीत एक वर्षापेक्षा जास्त काळ परवानगीशिवाय गैरहजर होते. आरोग्य विभाग अनेक महिन्यांपासून त्यांच्यावर कारवाई करण्याचा विचार करीत होता. अखेर, विभागाने शुक्रवारी सरकारी आदेश जारी करून त्यांना सेवेतून निलंबन करण्यास मान्यता दिली.