सॉफ्टवेअर इंजिनिअर असलेली इस्थर अनुया लोकमान्य टिळक टर्मिनसमध्ये उतरली आणि ती अंधेरीच्या वसतीगृहात न परतल्याने आई-वडिलांनी हरवल्याची तक्रार दाखल केली. पोलिसांकडे चौकशी करण्यासाठी गेलेल्या आई-वडिलांना, तुमची मुलगी कोणाबरोबर तरी पळून गेली असेल. येईल परत, असे उत्तर ऐकविण्यात आले आणि काही दिवसांनी इस्थरचा मृतदेह आढळून आल्यानंतर पोलिसांची बोलती बंद झाली. मुंबईत दर आठवडय़ाला १६ ते २० वर्षे वयोगटातील दोन ते तीन मुली गायब होतात. त्यांच्या आईवडिलांना पोलिसांकडून अशीच उत्तरे ऐकायला मिळत आहेत. आपल्या मुलीचे काय झाले हे शेवटपर्यंत त्यांना कळत नाही.  
हरवलेल्या व्यक्तींच्या नोंदीसाठी मुंबई पोलिसांचा स्वतंत्र कक्ष आहे. या कक्षात दररोज किमान दोन ते तीनजण हरविल्याच्या तक्रारी दाखल होतात. या तक्रारींचा आढावा घेतला तर दर आठवडय़ाला दोन ते तीन अल्पवयीन मुली गायब होत असल्याचे दिसून येते. यापैकी काही मुली पळून जाऊन लग्नही करतात तर काहींना फुस लावून पळवून नेले जाते. यापैकी काही मुलींचा शोध लागतो तर काही मुलींचा शोध कधीच लागत नाही. अशा मुलींचा शोध घेण्याचा प्रयत्न पोलिसांकडूनही केला जात नाही. इस्थरप्रमाणे एखादीच्या आई-वडिलांनी पोलिसांवर दबाव आणला तरच शोध घेतला जातो.
इस्थर प्रकरणातही पोलिसांचा सुरुवातीला असाच आविर्भाव होता. परंतु तिचा मृतदेह सापडल्यानंतरच पोलिसांना त्यातील गांभीर्य लक्षात आले. गायब झालेल्या मुलींची तक्रार देण्यासाठी आलेल्या पालकांना पोलीस ठाण्याच्या पातळीवरही  प्रश्नांच्या भडिमारांना तोंड द्यावे लागते.
पोलीस ठाण्यात ओळख नसेल तर मुलीला शोधण्याचा प्रयत्न पोलीस करीत नाही. अत्याधुनिक युगात किमान मुलीच्या मोबाईल फोनचा तपशील घेऊन तिचा शोध घेण्याचा प्रयत्नही फारच क्वचित केला जातो. अन्यथा हरवल्याची तक्रार पोलिसांच्या विशेष कक्षात स्थिरावते. पोलिसांच्या वेबसाइटवरील हरवलेल्या व्यक्तींच्या यादीत ती जाऊन बसते.
चार वर्षांचा आढावा घेतला असता, दरवर्षी किमान चारशे ते पाचशे व्यक्ती हरवतात. त्यामध्ये शंभर अल्पवयीन मुली असतात. काही जणी लग्नासाठी पळून जातात. त्यापैकी काहींचा शोध लागतो. मात्र २० ते ३० मुलींचा शोध लागत नाही. त्यांचे पुढे काय झाले हे कळून येत नाही.
१ ते १९ जानेवारी २०१४ या काळातील माहितीनुसार या १९ दिवसांत १९ अल्पवयीन मुली हरवल्याची तक्रार नोंदविण्यात आली आहे. यामध्ये प्रामुख्याने १६ ते २० वर्षे वयोगटातील मुलींचा समावेश आहे. धारावी, साकीनाका, मालाड पूर्व, चुनाभट्टी, जोगेश्वरी, दिंडोशी, अंधेरी, ट्रॉम्बे आदी पोलीस ठाण्यांच्या हद्दीत तक्रारींची नोंद झाली आहे.