मुंबई : मन विचलित झालं तरी हाताची सर्जनशीलता कायम असते, हे सिद्ध केलं आहे ठाणे मनोरुग्णालयातील महिला रुग्णांनी. रक्षाबंधनाच्या निमित्ताने या महिलांनी स्वतःच्या हातांनी तयार केलेल्या तब्बल १२०० राख्या सध्या सर्वांचं लक्ष वेधून घेत आहेत. या राख्या काही रुग्णालयात होणाऱ्या रक्षाबंधन कार्यक्रमात वापरण्यात येणार असून, काही राख्या विक्रीसाठी ठेवण्यात आल्या आहेत.
रुग्णांना स्वावलंबी बनवून त्यांना समाजात पुन्हा ताठ मानेने उभं करता यावं, यासाठी ठाणे मनोरुग्णालयातील व्यवसाय उपचार विभागाकडून सातत्याने प्रयत्न केले जातात. मनोरुग्णांमधील सुप्त कलागुण ओळखून त्यांना छोट्या छोट्या वस्तू तयार करण्याचं प्रशिक्षण दिलं जातं. यंदा रक्षाबंधनानिमित्त रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. नेताजी मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाही या रुग्णांना राखी तयार करण्याचं प्रशिक्षण देण्यात आलं. जुलै महिन्यापासूनच रुग्णालयातील सुमारे ५० ते ६० महिला रुग्ण या प्रशिक्षणात सहभागी झाल्या. त्यांना विविध प्रकारच्या राख्या दोऱ्यांच्या, मण्यांच्या, कापडाच्या, रंगीबेरंगी साहित्याने सजवलेल्या राख्या बनवायला शिकवण्यात आलं.
राख्या तयार करण्यासाठी लागणारं कच्चा साहित्य बाहेरून मागवण्यात आलं आणि त्या राख्यांमध्ये प्रत्येक रुग्णाचं कलेवर, कल्पनाशक्ती आणि एक अदृश्य जिव्हाळा गुंफलेला आहे. या संपूर्ण उपक्रमामागे रुग्णालयातील , व्यवसाय उपचार विभागाच्या तज्ज्ञ डॉ. हेमांगीनी देशपांडे, डॉ. आश्लेषा कोळी, डॉ. प्राजक्ता मोरे आणि डॉ. जानवी केरझरकर यांचं विशेष योगदान आहे.
सणासुदीच्या काळात रुग्णालयात उपचार घेत असलेले रुग्ण आपल्या घरापासून दूर असतात. त्यामुळे त्यांना आपल्या माणसांची, घराच्या उबदारपणाची आठवण येते. ही उणीव भरून काढण्यासाठी आणि सणाचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर खुलवण्यासाठी अशा उपक्रमांचं आयोजन केलं जातं. रक्षाबंधनाच्या दिवशी रुग्णालयातील पुरुष रुग्णांना महिला रुग्णांनीच बांधलेल्या या राख्या बांधून सण साजरा केला जाणार आहे. एक नात, भाऊ आणि बहीण यांच– जे रक्ताचं नसून समजुतीचं, आत्मीयतेचं आणि उपचाराच्या प्रक्रियेचा एक भाग म्हणून साजरं होणार आहे.
ठाणे मनोरुग्णालयातील या स्त्रियांनी बनवलेल्या राख्या म्हणजे फक्त एक हस्तकला नाही, तर त्या आहेत पुनर्वसनाचा आणि आत्मसन्मानाचा सुंदर धागा असल्याचे ठाणे प्रादेशिक मनोरुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. नेताजी मुळीक यांनी सांगितले.
आमच्या महिला रुग्णांनी बनवलेल्या ५०० राख्या देशाच्या सीमेवर लढणाऱ्या सैनिकांसाठी पाठवण्यात आल्या आहेत. ही त्यांच्याकडून एक भावना, एक प्रेमभेट असल्याचे रुग्णालयातील कर्मचारी आणि अधिकारी सांगतात.