लोकसत्ता प्रतिनिधी
मुंबई : मुंबईत नागरिकांच्या वायूप्रदूषणाबाबत तक्रारी वाढल्या असल्याचे प्रजा या स्वयंसेवी संस्थेने प्रसिद्ध केलेल्या अहवालातून समोर आले आहे. मुंबई आणि परिसरातून २०१९ ते २०२३ या कालावधीत वायूप्रदूषणाच्या तक्रारी ३०५ टक्क्यांनी वाढल्या आहेत.
अहवाल प्रजा संस्थेने मुंबईतील नागरी समस्यांबाबतचा अहवाल मंगळवारी सादर केला. त्यानुसार २०१९ ते २०२३ पर्यंत वायूप्रदूषणाच्या तक्रारी ३०५ टक्क्यांनी तर, ध्वनी प्रदूषणाच्या तक्रारी १८३ टक्क्यांनी वाढल्या आहेत. तसेच २०१९ ते २०२३ दरम्यान मुंबईतील हवेच्या गुणवत्तेत २२ टक्क्यांनी घट झाल्याचे या अहवालातून समोर आले आहे. दरम्यान, काही महिन्यांपूर्वी मुंबईतील हवेची गुणवत्ता खालावलेली होती अनेक भागात वाईट हवेची नोंद झाली होती. त्यामुळे मुंबई आणि आसपासच्या शहरात हिवताप, डेंग्यू यांच्या रूग्णसंख्येत देखील वाढ झाली होती. अनेकांना त्यामुळे श्वसनाच्या आजारांनी सामोरे जावे लागले.
आणखी वाचा-मुंबई : चुनाभट्टी येथील राहुल नगर नाल्याची आद्यपही सफाई नाही; पाणी तुंबण्याची भीती
अहवालानुसार २०१४ मध्ये १३५ प्रदूषणाच्या तक्रारी नोंदविण्यात आल्या होत्या तर २०२३ मध्ये ७६० तक्रारींची नोंद झाली. तसेच २०१४ मध्ये घनकचरा व्यवस्थापनाच्या ७,३३१ तक्रारी नोंदविण्यात आल्या होत्या तर २०२३ मध्ये २४,६९० तक्रारींची नोंद झाली आहे.
पाणीपुरवठ्याबाबत २०१४ मध्ये ७,६४५ तक्रारींची नोंद झाली होती तर २०२३ मध्ये १४,७५२ तक्रारींची नोंद करण्यात आली. रस्ते तक्रारीमध्ये २०१४ साली २१,७७७ तक्रारी नोंदविण्यात आल्या होत्या तर २०२३ मध्ये तक्रारीमध्ये घट होऊन १०,५४९ तक्रारींची नोंद झाली.