मुंबई: कृष्ठरुग्णांसाठी रुग्णालयीन तत्त्वावर तसेच पुनर्वसन तत्त्वावर कार्यरत स्वयंसेवी संस्थांच्या अनुदानात वाढ करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.
कुष्ठरुग्णांसाठी रुग्णालय तत्वावर कार्य करणाऱ्या परिशिष्ट-अ मधील १३ खासगी स्वयंसेवी संस्थांना २ हजार २०० ऐवजी ६ हजार ६०० रुपये एवढे अनुदान देण्यात येणार आहे. या रुग्णालयात कुष्ठरुग्णांच्या खाटांच्या परिरक्षणाचे अनुदान, परिरक्षणार्थ खर्चाच्या ८०% अथवा जास्तीत जास्त दरमहा प्रतिरुग्ण ६ हजार ६०० रुपये याप्रमाणे यापैकी कमी असेल ती रक्कम अनुदान म्हणून देण्यात येणार आहे. यामध्ये एकूण २ हजार ८ खाटांचा समावेश आहे. त्याचबरोबर कुष्ठरुग्णांचे पुनर्वसन तत्त्वावर कार्य करणाऱ्या परिशिष्ट-ब मधील १६ स्वयंसेवी संस्थांना प्रतिरुग्ण दरमहा २ हजारांवरून आता ६ हजार रुपये एवढे अनुदान देण्यात येणार आहे. यामध्ये एकूण १ हजार ९७५ खाटांचा समावेश आहे.