रात्री विजांच्या कडकडाटासह बरसणारा पाऊस आणि दुपारी फार तर ३२ अंश सेल्सिअसपर्यंत जाणारे तापमान.. तरीही गेला आठवडाभर मुंबईकर कमालीच्या उकाडय़ाने हैराण झाले आहेत. या उकाडय़ाला कारण ठरले आहे ते हवेतील बाष्पाचे वाढलेले प्रमाण. कुलाबा येथील सापेक्ष आद्र्रतेचे प्रमाण १०० टक्क्यांवर पोहोचले आहे तर सांताक्रूझ येथे ९० टक्क्यांच्या घरात हे प्रमाण असून त्यामुळेच तापमान फारसे वाढले नसतानाही मुंबईकरांना उकाडय़ाचा ताप सहन करावा लागत आहे.
आक्टोबर हिटला अजून अवधी असताना आणि तापमान ३६-३८ अंश सेल्सिअसवर गेले नसतानाही आठवडाभर उकाडय़ाने जीव हैराण का होतो आहे, असा प्रश्न मुंबईकरांना पडला आहे. घामाच्या धारांनी मुंबईकर हैराण झाले आहेत. वाढत्या तापमानानुसार हवेची बाष्प धरून ठेवण्याची क्षमताही वाढते. विशिष्ट तापमानाला हवेच्या बाष्प धरून ठेवण्याच्या कमाल क्षमतेशी तुलना करून निश्चित केलेले बाष्पाचे प्रमाण म्हणजे सापेक्ष आद्र्रता. शरीरातील वाढलेली उष्णता त्वचेतील छिद्रांमधून पाण्याच्या स्वरुपात बाहेर टाकण्यात येते. मात्र हवेतील बाष्पाचे प्रमाण जास्त असल्यास ही क्रिया मंदावते. आद्र्रता वाढल्यानंतर शरीरातून उष्णता बाहेर टाकण्याची क्षमता कमी होते आणि त्यामुळे वास्तविक तापमानापेक्षाही अधिक उकाडा जाणवतो. सध्या मुंबईच्या हवेत ९० ते १०० टक्के सापेक्ष आद्र्रता आहे. संध्याकाळीही हे प्रमाण ८० टक्क्यांपेक्षा खाली उतरत नाही. पश्चिम किनारपट्टीलगत असल्याने पावसाळाभर मुंबईतील सापेक्ष आद्र्रता जास्त असते. मात्र १०० टक्के प्रमाण ही दुर्मिळ घटना आहे.
आद्र्रता वाढल्यास वास्तविक तापमानापेक्षा अधिक तापमान जाणवते. त्याला ‘डिस्कम्फर्ट इंडेक्स’ म्हणतात. तापमान आणि आद्र्रता या दोघांवर अवलंबून असल्याने दिवसभरात ‘डीआय’ सतत बदलत असतो. मात्र दुपारी तापमान जास्त असताना हवेतील बाष्पाचे प्रमाणही जास्त असेल तर उकाडा जास्त जाणवतो,’ अशी माहिती मुंबई हवामानशास्त्र विभागाचे उपमहासंचालक के. एस. होसाळीकर यांनी दिली.