मुंबई : हिवाळा लांबल्याने बेजार झालेल्या मुंबईकरांना वाढत्या तापमानाबरोबरच मंगळवारी प्रदूषण वाढीचाही सामना करावा लागला. हवेत घातक पदार्थाचे प्रमाण वाढल्याने कुलाबा, माझगाव, वांद्रे-कुर्ला संकुल, मालाड येथील हवेची गुणवत्ता ‘अतिशय वाईट’ दर्जाची होती.

मुंबईत गेले काही दिवस पावसाळी वातावरण निर्माण झाले आहे. हवेचा वेगही मंदावला आहे. त्यामुळे हवेत ‘पीएम २.५’चे (घातक सूक्ष्मकण) प्रमाण वाढते आहे. कुलाबा येथे मंगळवारी २.५ मायक्रोमीटर व्यासाच्या अतिसूक्ष्मकणांचे (पीएम २.५) प्रमाण ३५३ तर १०मायक्रोमीटर व्यासाच्या सूक्ष्मकणांचे (पीएम १०) प्रमाण २०४ होते. मालाड येथे हे प्रमाण अनुक्रमे ३२१ आणि १४७ होते. माझगाव येथे ‘पीएम १०’चे प्रमाण मध्यम स्तरावर होते; मात्र ‘पीएम २.५’चे प्रमाण ३३७ वर गेल्याने हवेचा दर्जा ‘अतिशय वाईट’ होता. वांद्रे कुर्ला संकुल येथे ‘पीएम २.५’चे प्रमाण ३१३ तर ‘पीएम १०’चे प्रमाण २६३ होते. या सर्व ठिकाणी बुधवारीही हवा ‘अतिशय वाईट’ दर्जाची असण्याची शक्यता आहे.

पावसाळा संपला तरीही अरबी समुद्रात अधूनमधून निर्माण होणाऱ्या कमी दाबाच्या पट्टय़ामुळे मुंबईत पावसाळी स्थिती निर्माण होत आहे. तसेच दुसऱ्या बाजूला हिवाळाही सुरू होण्याच्या मार्गावर आहे. या काळात मुंबईतील हवेचा वेग मंदावतो. त्यामुळे स्थानिक प्रदूषण आणि त्याच्या जोडीला भोवतालच्या प्रदेशातून येणारे सूक्ष्मकण येथे साचून राहतात. शिवाय दिवाळी संपल्यानंतरही तुळशी विवाहाच्या निमित्ताने फटाक्यांची आतषबाजी सुरूच आहे. याचा परिणाम म्हणून मुंबईतील हवेचा दर्जा दिवसेंदिवस ढासळत आहे.

मुंबईच्या तापमानात मंगळवारी मोठी वाढ दिसून आली. सांताक्रूझ येथे ३५.७ अंश सेल्सिअस कमाल तर २५.४ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. येथे सरासरीच्या तुलनेत अनुक्रमे २ आणि ४ अंश सेल्सिअस वाढ झाली होती. कुलाबा येथे सरासरीच्या तुलनेत २ अंशांच्या वाढीसह २४.८ अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले तर कमाल तापमान ३४ अंश सेल्सिअस होते.