मुंबई : भारतामध्ये जवळपास ५० दशलक्ष भारतीय, विशेषतः महिला, थायरॉइड विकारांनी ग्रस्त आहेत आणि हे प्रमाण दरवर्षी मुंबईसारख्या मेट्रो शहरांमध्ये वाढताना दिसत आहे, असं आरोग्यविषयक शासकीय आकडेवारी व निदान करणार्या प्रयोगशाळांकडून मिळालेल्या आकडेवारीवरून दिसून येते.
नॅशनल फॅमिली हेल्थ सर्व्हे-४ ने असे आढळले की महाराष्ट्रातील १.८ टक्के महिलांना २०१५-२०१६ मध्ये गालगुंड (गॉइटर) किंवा इतर थायरॉइड विकार होते आणि एनएफएचएस-५ नुसार तीन वर्षांनी हे प्रमाण २.१ टक्के पर्यंत वाढले आहे. भारतात आरोग्य संस्थांच्या आकडेवारीनुसार हे प्रमाण २.२ टक्क्यांवरून २.७ टक्के पर्यंत वाढलेले दिसते.
आयोडीनची कमतरता, विशेषतः अंतर्गत भागांमध्ये, थायरॉइड विकारांचे एक मुख्य कारण आहे. आहारातील बदल, जीवनशैलीतील बदल, आणि पर्यावरणीय घटक देखील थायरॉइड विकारांच्या वाढीस कारणीभूत ठरतात. थायरॉईड विकारांची वाढती संख्या लक्षात घेता, नियमित तपासणी, योग्य आहार, आणि सततची वैद्यकीय देखरेख आवश्यक आहे. विशेषतः महिलांनी आणि वयस्कर व्यक्तींनी थायरॉइड तपासणीसाठी जागरूक राहणे गरजेचे आहे.
लीलावती हॉस्पिटल, वांद्रे येथील ज्येष्ठ एंडोक्रायनोलॉजिस्ट डॉ. शशांक जोशी म्हणाले की, वाढलेली संख्या ही लोकांमधील या आजाराविषयची वाढती जागरूकता आणि थायरॉइड निदान चाचण्यांमुळे दिसून येते. ऑटोइम्युनिटी ही संपूर्ण जगभर वाढत आहे आणि भारतही याला अपवाद नाही, परंतु थायरॉइड विकारांच्या संख्येमध्ये वाढ होणं हे जागरूकता आणि निदानाचं प्रतिबिंब आहे, असं ते म्हणाले. ऑटोइम्युनिटी ही अशी स्थिती आहे जिथे शरीराची प्रतिकारशक्ती आपल्याच पेशींना, ऊतींना किंवा अवयवांना चुकीने हल्ला करते. ऑटोइम्यून थायरॉइड विकार हायपरथायरॉइडिझम (ग्रेव्ह्स डिजीज) किंवा हायपोथायरॉइडिझम (हॅशिमोटो थायरॉइडायटीस) हे जगातील सर्वात सामान्य ऑटोइम्यून विकारांपैकी आहेत. आजच्या महिला एकाच वेळी अनेक कामं करतात आणि काम व कुटुंब यासंबंधी तणावांमुळे थायरॉइड विकारांची शक्यता वाढते तसेच अन्यही काही कारणे असल्याचे डॉ शशांक जोशी यांनी सांगितले.
थायरॉइड ही मानेमध्ये असलेली एक छोटी ग्रंथी असून ती शरीरातील चयापचय आणि संप्रेरक (हॉर्मोन्स) नियंत्रित करते. विकारांमुळे ही ग्रंथी कमी कार्यक्षम (हायपोथायरॉइडिझम) किंवा जास्त कार्यक्षम (हायपरथायरॉइडिझम) होऊ शकते आणि या दोन्ही स्थिती माणसाच्या मन:स्थिती, वजन, ऊर्जा पातळी आणि हृदयाच्या आरोग्यावर परिणाम करतात.सर्वसामान्य लक्षणांमध्ये वजन वाढ किंवा घट, तापमानाची संवेदनशीलता (उष्ण किंवा थंड वातावरणात असहजता), हृदयगतीत बदल, त्वचा आणि केसांतील बदल यांचा समावेश होतो. इतर लक्षणांमध्ये मन:स्थितीत बदल, पचनाच्या तक्रारी (जसे की बद्धकोष्ठता), आणि मासिक पाळीतील अनियमितता यांचा समावेश होतो. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे थायरॉइड विकार उपचारक्षम असल्याने लवकर निदान होणे हे अत्यंत महत्त्वाचं आहे, असं डॉ. जोशी म्हणाले. २५ मे हा ‘वर्ल्ड थायरॉइड डे’ म्हणून पाळला जातो आणि यावर्षीची थीम आहे, ‘लवकर निदान आणि उपचारांवर लक्ष केंद्रित करा’. आधुनिक निदान पद्धतींमुळे थायरॉइड विकार आधीपेक्षा सोप्या पद्धतीने आणि लवकर शोधता येतात आणि त्यावर उपचार करता येतात,असेही त्यांनी सांगितले.
निदानातील प्रगतीमुळे थायरॉईडचा निदान दर वाढत असल्याचे कांदिवली येथील हितवर्धक मंडळ हॉस्पिटलच्या डॉ नीता सिंगी यांनी सांगितले. कृत्रिम बुद्धिमत्ता ही थायरॉइड उपचारांचे भविष्य नसले तरी एआय टूल्स आता काही सेकंदात असामान्य गोष्टी शकतात तसेच प्रयोगशाळेचे रिपोर्ट्स समजावून सांगू शकतात आणि अगदी उद्भवणाऱ्या विकारांचं भाकीत करू शकतात असेही त्या म्हणाल्या. प्रामुख्याने चाळीशी पुढील महिलांनी थायरॉईड चाचणी करणे गरजेचे असल्याचे डॉ सिंगी म्हणाल्या.