मुंबई : राज्यात नव्याने आढळणाऱ्या करोनाबाधितांच्या संख्येत गेल्या आठवडाभरात ३२ टक्क्यांनी वाढ झाली आहे. सर्वाधिक वाढ मुंबईत झाली असून त्या खालोखाल पुणे, ठाणे आणि नगर जिल्ह्यांचा समावेश आहे. गुरुवारी राज्यात २३१ रुग्ण नव्याने आढळले, तर एका रुग्णाचा मृत्यू झाला.

रुग्णसंख्येत वाढ झाली असली तरी सुमारे तीन टक्केच रुग्ण रुग्णालयात उपचार घेत आहेत. गेल्या आठवडय़ापासून राज्यातील दैनंदिन रुग्णसंख्या दोनशेच्या वर गेली आहे. २७ एप्रिल ते ३ मे या आठवडय़ात राज्यभरात १ हजार ९७ रुग्ण नव्याने आढळले. तर ४ ते १० मे या आठवडय़ात हे प्रमाण १ हजार ४४७ वर गेले आहे. आठवडाभरात नव्या रुग्णांच्या संख्येत सुमारे ३२ टक्क्यांनी वाढ झाली आहे.

रुग्णसंख्या वाढत असल्याने उपचाराधीन रुग्णांची संख्याही गेल्या आठवडाभरात हजाराच्याही वर गेली आहे. दिवसेंदिवस यात आणखीनच भर पडत असून सध्या राज्यात १४३४ .उपचाराधीन आहेत. सर्वाधिक ८६० उपचाराधीन रुग्ण मुंबईत असून त्या खालोखाल पुणे, ठाणे यांचा समावेश आहे.

गुरुवारी राज्यात २०८ रुग्ण करोनामुक्त झाले असून २३१ रुग्ण नव्याने आढळले आहेत. गुरुवारी सोलापूरमध्ये एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. मुंबईत गुरुवारी १३९ रुग्ण नव्याने आढळले आहेत, तर १३० रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. रुग्णालयात दाखल रुग्णांचे प्रमाण कमीच  रुग्णसंख्या वाढत असली तरी उपचाराधीन रुग्णांच्या तुलनेत सुमारे ३.३५ टक्के रुग्ण रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाले आहेत. यातील ०.७४ टक्के रुग्णांची प्रकृती गंभीर आहे. राज्यभरात अतिदक्षता विभागामध्ये केवळ पाच रुग्ण उपचार घेत आहेत.

राज्यातील बाधितांचे प्रमाण एक टक्का

दैनंदिन रुग्णसंख्या वाढत असल्याने बाधितांचे प्रमाण एक टक्का झाले आहे. राज्यात सध्या सर्वाधिक सुमारे २.२३ टक्के बाधितांचे प्रमाण बुलढाण्यामध्ये आहे, तर या खालोखाल औरंगाबादमध्ये २.१२ टक्के, मुंबईत १.७९ टक्के, पुण्यात १.६५ टक्के तर नांदेडमध्ये एक टक्का आहे. हे पाच जिल्हे वगळता अन्य जिल्ह्यांमध्ये बाधितांचे प्रमाण एक टक्क्याखाली आहे.

अन्य जिल्ह्यांमध्येही तुरळक वाढ

मुंबई, पुणे, ठाणे, रायगड आणि नगर वगळता राज्यातील अन्य जिल्ह्यांमध्येही रुग्णसंख्येत तुरळक वाढ झाली आहे. गेल्या आठवडय़ात अन्य जिल्ह्यांमध्ये ८२ रुग्ण नव्याने आढळले होते, तर या आठवडय़ात ही संख्या ११० वर गेली आहे.