अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने विविध वस्तू खरेदी करण्यापाठोपाठ आता घराबाहेर पाय न काढता शहरात भ्रमणध्वनीच्या केवळ काही क्लिकवर डॉक्टरांचा सल्ला घेण्याचा कल वाढत आहे. अॅप्लिकेशनच्या मदतीने भ्रमणध्वनीद्वारे संदेश पाठवून, संपर्क साधून आणि व्हिडीयो कॉन्फरन्सच्या माध्यमातून डॉक्टर आणि रुग्ण सुसंवाद साधत आहेत. याचा फायदा रुग्णांना होत असला तरी निदान चुकीचे होऊ नये, यासाठी पहिल्यावेळेत डॉक्टरांना भेटणे आवश्यक असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.
गेल्या ऑक्टोबरमध्ये ‘टॉप डॉक्टर ऑनलाइन’ या अॅप्लिकेशनची सुरुवात करण्यात आली. अवघ्या तीन महिन्यांत २० हजार लोकांनी हे अॅप डाऊनलोड केले असून, यातील सुमारे चार हजार रुग्ण आणि डॉक्टरांनी ऑनलाइन विचारविनिमय केले आहे. यात सर्वाधिक लोकांनी लांबपल्ल्याच्या प्रवासात अॅपद्वारे डॉक्टरांना संपर्क साधल्याचे समोर आले आहे. या अॅपच्या माध्यमातून जवळपास असणारे रुग्णालय, निदान केंद्र, रक्त तपासणी, निदानासाठी डॉक्टरांना भेटण्याची वेळ आदी विषयी माहिती पुरविली जाते. याशिवाय आरोग्यशास्त्र, वैद्यकीय क्षेत्रात सुरू असणारे प्रयोग आदींची माहिती डिजिटल आरोग्यविषयी अॅपद्वारे पुरविली जात आहे.
मेडिकल काऊन्सिल ऑफ इंडियाच्या आकडेवारीनुसार देशात दोन हजार रुग्णांपाठी अवघा एकच डॉक्टर उपलब्ध आहे. त्यामुळे अनेक वेळा दुर्गम भागात वैद्यकीय उपचार मिळणे कठीण होऊन बसते. याशिवाय लांबपल्ल्याच्या प्रवासात रुग्णांना वेळेत माहिती उपलब्ध व्हावी, त्यांना मार्गदर्शन मिळावे, यासाठी हे अॅप तयार करण्यात आले आहे. आर्थिक स्थिती गरीब असो किंवा श्रीमंत रुग्णांना वैद्यकीय सल्ला, मदत आणि उपचार मिळावे हा हेतू असल्याचे सहसंस्थापक आनंद चटर्जी यांनी सांगितले. ऑनलाइन अॅप्लिकेशन पद्धतीने वैद्यकीय सल्ला मिळत आहे. त्यामुळे रुग्णांचे प्रकार आणि वैद्यकीय अहवाल मिळू शकते. मात्र निदानासाठी रुग्णांनी पहिल्यांदा तरी डॉक्टरांना प्रत्यक्ष भेटणे आवश्यक आहे. अन्यथा डॉक्टरांकडून चुकीचे निदान होऊ शकते. त्यामुळे अचूक निदानासाठी डॉक्टरांसमोर प्रत्यक्षात भेटणे आवश्यक असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.
संग्रहित लेख, दिनांक 16th Dec 2015 रोजी प्रकाशित
डिजिटल डॉक्टरांना वाढती मागणी
गेल्या ऑक्टोबरमध्ये ‘टॉप डॉक्टर ऑनलाइन’ या अॅप्लिकेशनची सुरुवात करण्यात आली.
Written by मोरेश्वर येरमविश्वनाथ गरुड

First published on: 16-12-2015 at 08:42 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Increasing demand for digital doctor