मध्य रेल्वेवर सर्वाधिक चोरीच्या घटना
गर्दीच्या वेळी रेल्वे मार्गावर सर्रास घडणाऱ्या पाकिटमारीच्या तुलनेत भ्रमणध्वनी चोरीच्या घटनांमध्ये कमालीची वाढ झाली आहे. यंदाच्या जानेवारी ते सप्टेंबर या कालावधीत रेल्वे मार्गावरील भ्रमणध्वनी चोरीचा आकडा तब्बल १ हजार ६८७ वर पोहोचला आहे. यात मध्य रेल्वे विभागात सर्वाधिक म्हणजे ११७३ भ्रमणध्वनी चोरीच्या घटना घडल्या आहेत. या पाश्र्वभूमीवर मुंबई लोहमार्ग पोलिसांकडून अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून भ्रमणध्वनी चोरांच्या मुसक्या आवळल्या जात आहेत. यात आतापर्यंत चोरीला गेलेले ९१९ भ्रमणध्वनी रेल्वे पोलिसांनी हस्तगत केले असल्याचे लोहमार्ग पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.
रेल्वेच्या तिन्ही मार्गावर रोज ७५ लाख प्रवासी प्रवास करतात. सकाळी व संध्याकाळी प्रवाशांची उसळणारी गर्दी प्रचंड असते. यात अनेक वेळा प्रवाशांना दरवाजात उभे राहून प्रवास करावा लागतो. याच गोष्टीचा फायदा घेत मोबाइल चोर प्रवाशांचे मोबाइल लंपास करत आहेत.  या चोरांना पकडण्यासाठी पोलिसांकडून भ्रमणध्वनी तयार करणाऱ्या कंपन्यांची मदत घेतली जात आहे. कंपनीकडून भ्रमणध्वनीत बसवण्यात आलेल्या ‘इलेक्ट्रॉनिक चिप’च्या मदतीने चोरांचा तपास लावण्यात येत आहे. याशिवाय रेल्वे स्थानकांवर बसवण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या मदतीने चोरांचा छडा लावला जात आहे.
विशेष म्हणजे पोलिसांकडून या कामासाठी स्थानिक खबऱ्याचीही मदत घेतली जात असल्याचे लोहमार्ग रेल्वे पोलिसांनी सांगितले. भ्रमणध्वनी चोराकडून रेल्वे मार्गावर भ्रमणध्वनीची चोरी करण्यासाठी या चोरांकडून अल्पवयीन मुलांची मदत घेतली जात होती. याची माहिती मिळताच रेल्वे पोलिसांनी रेल्वे मार्गामधील सिग्नलजवळील सुरक्षा वाढवली आहे. वेळापत्रक सुरळीत चालावे यासाठी रोज काही लोकलचा वेग काही ठिकाणी कमी केला जातो. अशा ठिकाणी, सिग्नलजवळील खांबावर अल्पवयीन मुलांना चढवले जाते.
त्यांच्या हातात काठी दिली जाते व दरवाजात उभे राहून भ्रमणध्वनीवर बोलणाऱ्या प्रवाशांच्या हातावर काठीने फटका मारण्यास त्यांना सांगितले जाते. भ्रमणध्वनी हातातून खाली पडला की, तो तुटू नये यासाठी काही लोक तो झेलण्यासाठी उभे असतात. ही बाब उघडकीस येताच रेल्वे पोलिसांकडून अशा ठिकाणी विशेष लक्ष ठेवले जात असल्याचे लोहमार्ग पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.
छत्रपती शिवाजी टर्मिनस ते कुर्ला विभागादरम्यान ४७८, ठाणे ते कल्याणदरम्यान ४०२, वडाळा ते पनवेलदरम्यान २९३, चर्चगेट ते अंधेरीदरम्यान ३२९, तर बोरिवली ते पालघरदरम्यान ६९९ भ्रमणध्वनी चोरीला गेले आहेत. त्यापकी ९१९ भ्रमणध्वनींचा तपास लावण्यात पोलिसांना यश आले आहे, तर इतर चोरीच्या गुन्हय़ांचा तपास लोहमार्ग पोलीस करत आहेत.