मुंबई : ‘‘भारत गेल्या काही वर्षांत क्रीडा क्षेत्राच्या विकासासाठी भरीव प्रयत्न करीत असून, देशाने अनेक जागतिक स्पर्धाचे यशस्वी आयोजन करून आपले सामथ्र्य सिद्ध केले आहे. आता २०३६ च्या ऑलिम्पिक स्पर्धेच्या यजमानपदासाठी आणि २०२९ च्या युथ ऑलिम्पिकच्या आयोजनासाठीही आम्ही सज्ज आहोत. देशात ऑलिम्पिक स्पर्धेच्या आयोजनाचे भारतीयांचे स्वप्न साकारण्याची संधी आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक संघटना देईल, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी व्यक्त केला.

  आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या १४१ व्या अधिवेशनाच्या उद्घाटन समारंभात मोदी बोलत होते. या वेळी ऑलिम्पिक समितीचे अध्यक्ष थॉमस बाक, राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार, पालकमंत्री दीपक केसरकर, आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या सदस्या नीता अंबानी, भारतीय ऑलिम्पिक समितीच्या अध्यक्षा पी.टी. उषा आदी उपस्थित होते.

आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक संघटनेचे अधिवेशन मुंबईत होणे, ही आमच्यासाठी गौरवाची बाब असून, भारतात खेळ हा जीवनशैलीचा भाग आहे. अगदी खेडय़ात गेलात तरी खेळाशिवाय कोणताही सण साजरा होत नाही. भारतीय केवळ क्रीडाप्रेमीच नाहीत, तर खेळ हा भारतीयांच्या जीवनाचा अविभाज्य घटक असल्याचे प्रारंभीच स्पष्ट करून मोदी यांनी देशात क्रीडा संस्कृती वृध्दींगत करण्यासाठी सरकार करत असलेल्या प्रयत्नांचा गौरवपूर्ण उल्लेख केला. मोदी यांनी देशातील क्रीडा संस्कृतीच्या इतिहास आणि परंपरेचा उल्लेख करताना धौलाविरा आणि राखीगढी या युनेस्कोच्या वारसा स्थळांची आठवण करून दिली. गुजरातमधील धौलाविरामध्ये खोदकाम करताना ते पाच हजार वर्षांपूर्वी क्रीडा शहर असल्याचे आढळून आले असून, तेथे दहा हजार प्रेक्षक बसू शकतील, असे भव्य मैदान त्या काळात बांधण्यात आल्याचे पुरावे आढळून आल्याचेही त्यांनी सांगितले.

हेही वाचा >>>इंग्लंडचा अफगाणिस्तानशी सामना

 देशात क्रीडा क्षेत्र आणि खेळाडूंना अधिकाधिक प्रोत्साहन देण्यासाठी सरकार गेल्या काही काळात जाणीवपूर्वक प्रयत्न करीत आहे. त्यामुळे भारतीय खेळाडूंनी अनेक आंतरराष्ट्रीय आणि जागितक स्पर्धामध्ये चांगले यश संपादन केले असून, भारताची क्रीडा क्षेत्रातील कामगिरी उंचावली आहे. अलिकडेच पार पाडलेल्या आशियाई स्पर्धेत भारताने ऐतिहासिक कामगिरी केली. गेल्या काही वर्षांत भारताने बुद्धीबळ, १७ वर्षांखालील मुलींच्या विश्वचषक फुटबॉल स्पर्धा, विश्वचषक हॉकी स्पर्धा, जागतिक नेमबाजी अशा स्पर्धाचे यजमानपद सांभाळताना या स्पर्धाचे यशस्वी आयोजन केले आहे. सध्या भारतात विश्वचषक क्रिकेट स्पर्धा सुरू असून, क्रिकेटचा ऑलिम्पिकमध्ये समावेश करण्याबाबतची शिफारस आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक संघटनेच्या कार्यसमितीने केली आहे, ही आनंदाची बाब आहे. याबाबत चांगला निर्णय होईल अशी अपेक्षा असल्याचे मोदी म्हणाले. विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारताने पाकिस्तानवर विजय मिळविल्याबद्दल मोदी यांनी यावेळी भारतीय संघाचे अभिनंदन केले.

  जागतिक स्पर्धाचे आयोजन हे आमच्यासाठी जगभरातील देशांच्या स्वागताची संधी असते. वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था आणि चांगल्या पायाभूत सुविधा, यामुळे मोठय़ा जागतिक स्पर्धाच्या आयोजनासाठी भारत सज्ज आहे, हे जगाने जी-२०च्या आयोजनातून अनुभवले आहे. त्यामुळे १४० कोटी भारतीयांचे स्वप्न साकारण्यासाठी २०३६ च्या ऑलिम्पिक स्पर्धेच्या आयोजनाची संधी मिळावी. तसेच सन २०२९च्या युथ ऑलिम्पिक स्पर्धेच्या आयोजनासाठीही आम्ही इच्छुक आहोत. त्यासाठी आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक संघटना आम्हाला सहकार्य करेल, असा विश्वास मोदी यांनी व्यक्त केला.

(आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या अधिवेशनाच्या उद्घाटनप्रसंगी समितीचे अध्यक्ष थॉमस बाख यांच्यासह पंतप्रधान नरेंद्र मोदी.)