दहशतवादी हल्ला होऊन नऊ वर्षे लोटले. पण अजूनही आमच्या कुटुंबीयांना बाबा घरी येतील असे वाटते, हे उद्गार आहेत मुंबई हल्ल्यावेळी दहशतवादी अजमल कसाबला जिवंत पकडताना वीरमरण आलेल्या तुकाराम ओंबाळेंची मुलगी वैशालीचे. पाणावलेल्या डोळ्यांनी ती आपल्या वडिलांची आठवण सांगत होती. ती म्हणाली, आम्हाला नेहमी असं वाटतं की, बाबा कोणत्याही क्षणी घरी येतील. पण आम्हाला याचीही जाणीव आहे की, ते आता कधीच येणार नाहीत. एमएडपर्यंत शिक्षण झालेल्या वैशालीला शिक्षिका व्हायचं आहे.

‘भाषा’ या वृत्तसंस्थेशी बोलताना ती म्हणाली, आम्हाला नेहमी वाटतं की बाबा कामाला गेलेत आणि ते घरी परतणार आहेत. आम्ही त्यांचं सामान घरातील त्याच जागांवर ठेवलं आहे, जिथे ते ठेवत असत. त्यांच्या बलिदानावर आम्हाला गर्व आहे. तुकाराम ओंबाळे हे मुंबई पोलिसांत सहायक उपनिरीक्षक म्हणून कार्यरत होते. दि. २६ नोव्हेंबर २००८ रोजी रात्री उशिरा कसाबला पकडण्याच्या प्रयत्नात त्यांना गोळी लागली व त्यातच त्यांचा मृत्यू झाला होता.

तुकाराम ओंबाळेंच्या धाडसी प्रयत्नामुळेच कसाब जिवंत पकडला गेला होता. नंतर कसाबला फाशी देण्यात आली. नऊ वर्षे लोटली, पण असा एकही दिवस गेला नाही की जेव्हा आम्हाला त्याची आठवण आली नाही, असे वैशाली सांगते. ती आपली आई तारा आणि बहीण भारतीबरोबर वरळी पोलीस कॅम्पमध्ये राहते. भारती ही राज्य सरकारच्या जीएसटी विभागात काम करते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

२६ नोव्हेंबरच्या रात्री पाकिस्तानी दहशतवादी समुद्र मार्गे भारताच्या आर्थिक राजधानीत घुसले होते. आधुनिक हत्यारांनी सुसज्ज असलेल्या या दहशतवाद्यांनी मुंबईतील सीएसटी, नरिमन हाऊस आणि ताज हॉटेलमध्ये अंदाधुंद गोळीबार केला होता. या घटनेत १६६ निष्पाप लोक मारले गेले होते. यात १८ सुरक्षा रक्षकांचा समावेश होता. मुंबई पोलिसांनी दहशतवाद्यांना चोख प्रत्युत्तर देत ९ दहशतवाद्यांना यमसदनी धाडले होते. तर अजमल कसाबला तुकाराम ओंबाळे यांनी जिवंत पकडले होते. परंतु, यामध्ये त्यांना आपले प्राण गमवावे लागले होते.