मुंबई : बदलत्या जीवनशैलीमुळे उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये वाढत असलेल्या मानसिक आरोग्य समस्यांबाबत जागृतीसाठी आणि विद्यार्थ्यांना सहाय्य करण्यासाठी केंद्रीय शिक्षण मंत्रालय व विद्यापीठ अनुदान आयोगाने (युजीसी) पावले उचलली आहेत. उच्च शिक्षण संस्थांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्यासाठी विद्यापीठे व महाविद्यालयांमध्ये ‘टेलीमानस’ या सुविधाचा वापर करण्याचे आदेश युजीसीने दिले आहेत.
मानसिक ताण-तणावाखाली वावरणाऱ्या नागरिकांना सहज उपचार व मार्गदर्शन मिळावे यासाठी केंद्र सरकारच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने १० ऑक्टोबर २०२२ रोजी दूरध्वनी-आधारित टेलीमानस सुविधा सुरू केली. या सुविधेला देशभरातून प्रतिसाद मिळत आहे. देशभरात ५३ केंद्रांच्या माध्यमातून आतापर्यंत २३ लाखांहून अधिक दूरध्वनी या केंद्रांकडे आले आहेत. २० भाषांमधून २४ तास ही सुविधा उपलब्ध असल्याने नागरिकांचा या सुविधेला प्रचंड प्रतिसाद आहे.
वाढत्या गरजेनुसार आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने काही राज्यांमध्ये चित्रफितीच्या माध्यमातून सुविधा उपलब्ध करून दिली. त्यानंतर या सेवेचा देशव्यापी विस्तार करण्यात आला आहे. तसेच टेलीमानसचे इंग्रजी आणि हिंदी मोबाइल ॲपही सुरू करण्यात आले आहे. या प्लॅटफॉर्ममुळे विद्यार्थ्यांसह नागरिकांना प्रत्यक्ष मानसिक आरोग्य तज्ज्ञांशी ऑनलाइन संवाद साधता येत आहे, विशेषतः दुर्गम भागांमध्ये हे मोठे सहाय्य ठरत आहे.
सर्वसामान्य नागरिकांबरोबरच देशाचे भवितव्य असलेल्या उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मानसिक तणावातून बाहेर काढण्यासाठी आता यूजीसीने विद्यापीठे व महाविद्यालयांमध्ये टेलीमानस या सुविधेचा प्रचार करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार देशातील सर्व विद्यापीठे, महाविद्यालयांचे संकेतस्थळ, माहिती पुस्तिका, समाजमाध्यमे आणि परिसरात डिजिटल फलकाच्या माध्यमातून टेलीमानसचा हेल्पलाईन क्रमांक १४४१६ आणि १८००८९१४४७६ हा क्रमांक विद्यार्थ्यांपर्यंत पोहचवावा. त्याचप्रमाणे ग्रंथालये, समुपदेशन केंद्रे, सूचना फलकांवर टेलीमानस मोबाईल ॲपचा क्यूआर कोड द्यावा, असेही यूजीसीकडून सांगण्यात आले आहे.
