मुंबई : भारतीय रेल्वेच्या प्रवासी आरक्षण प्रणालीवरून (पीआरएस) तिकीट आरक्षण करताना अनेकदा तांत्रिक अडचणी येतात. त्यामुळे प्रवाशांना तिकीट काढण्यास खूप प्रतीक्षा करावी लागते. विशेषत: सुट्ट्यांमध्ये किंवा सणासुदीच्या काळात तिकीट काढताना प्रचंड गैरसोय होते. एकाच वेळी अनेक तिकीट काढली जात असल्याने, यंत्रणेवर भार येतो. त्यामुळे तिकीट रद्द होणे, पैसे कापले जातात, परंतु तिकीट मिळत नाही. या समस्येचे निराकरण करण्यासाठी डिसेंबर २०२५ पर्यंत पीआरएस यंत्रणा अद्ययावत केली जाणार आहे. त्यानंतर दर मिनिटाला १.५० लाख तिकिटे काढणे शक्य होईल.
उन्हाळी सुट्टी, सण-उत्सव काळात आरक्षण केंद्रावर प्रवाशांची प्रचंड गर्दी असते. त्यामुळे एकाच वेळी अनेक तिकिटे काढण्याचा प्रयत्न केल्यास ती मिळत नाहीत. तसेच प्रणालीमध्ये भाषेची समस्या असल्याने काही प्रवाशांना तिकीट आरक्षित करताना अडचणींचा सामना करावा लागतो. याबाबत अनेक प्रवाशांच्या तक्रारी होत्या. त्यामुळे यात सुधारणा करून, अद्ययावत यंत्रणा तयार करण्यात येणार आहे.
नव्या प्रणालीमध्ये कोणत्या सुविधा ?
सध्याच्या आरक्षण प्रणालीमधील त्रुटी नव्या प्रणालीत दूर करण्यात येणार आहेत. आधुनिक आरक्षण प्रणाली वेगवान, बहुभाषिक आणि सध्याच्या भाराच्या तुलनेत १० पट जास्त भार हाताळण्याची क्षमता असेल. तसेच प्रतिमिनिटाला ४० लाख चौकशींचा सामना करण्यास यंत्रणा सक्षम असेल. नवीन आरक्षण प्रणाली सर्वसमावेशक असेल. त्यात आसन निवड आणि भाडे तक्त्यासाठी प्रगत यंत्रणा; तसेच दिव्यांगजन, विद्यार्थी आणि रुग्णांसाठी एकात्मिक पर्याय असतील.
तिकीट जलद मिळणार
सध्या प्रति मिनिटाला सुमारे ३२ हजार तिकीटे काढण्याची क्षमचा यंत्रणेत आहे. तर, डिसेंबर २०२५ पर्यंत सुधारित प्रणालीद्वारे दर मिनिटाला १.५० लाख तिकिटे काढण्याची क्षमता असेल. प्रवासी आरक्षण प्रणाली वारंवार अद्ययावत करण्याची प्रक्रिया सुरू असते. त्यामुळे तिकिटे काढण्याची कृती वेगात होते. २२ मे रोजी ३१,८१४ तिकिटे एका मिनिटात काढली गेली होती.
भारतीय रेल्वेचे नवे ‘रेल वन’ ॲप सुरू
रेल्वे सूचना प्रणाली केंद्राच्या (क्रिस) ४० व्या स्थापनादिनानिमित्त रेल्वेमंत्री आश्विनी वैष्णव यांनी रेल वन ॲप सुरू केले. हे ॲप अँड्रॉइड प्लेस्टोअर आणि आयओएस ॲप स्टोअर दोन्हीवर उपलब्ध आहे. रेलवन ॲप हे प्रवाशांच्या सर्व आवश्यक सेवांसाठी उपलब्ध झाले आहे. या ॲपद्वारे तीन टक्के सवलतीसह आरक्षित, अनारक्षित, फलाट तिकिटे काढणे शक्य होईल. रेल्वेगाडी आणि पीएनआर चौकशी, रेल्वे मदत सेवा, तक्रार निवारण, रेल्वेगाडीमध्ये जेवणाची सोय उपलब्ध करून देण्यासाठी, मालवाहतुकीबाबत संबंधित चौकशी करण्याची सोय आहे. आयआरसीटीसीवर आरक्षित तिकिटांची उपलब्धता कायम राहील. आयआरसीटीसीसोबत भागीदारी केलेल्या इतर अनेक व्यावसायिक ॲपप्रमाणेच रेल वन ॲपलाही आयआरसीटीसीने अधिकृत केले आहे.
रेलवन ॲपचे फायदे काय ?
रेलवन ॲपचे एक विशेष वैशिष्ट्य म्हणजे याला एकाच साइन-ऑन असल्याने वापरकर्त्यांना अनेक पासवर्ड लक्षात ठेवण्याची गरज नाही. रेलवन ॲप डाऊनलोड केल्यानंतर, रेल कनेक्ट किंवा यूटीएस ऑन मोबाइल ॲपचा आयडी वापरून लाॅगिन करता येईल. त्यामुळे मोबाइलमधील स्टोरेजची बचत होईल. ॲपमध्ये आर-वाॅलेट (रेल्वे ई-वाॅलेट) सुविधा आहे. नवीन वापरकर्त्यांना नोंदणी कमीत कमी माहितीसह केली जाईल. ज्यामुळे नोंदणी प्रक्रिया सोपी आणि जलद होते. जे वापरकर्ते फक्त चौकशी करतात, ते मोबाइल क्रमांक आणि ओटीपी वापरूनही लाॅगिन करू शकतात.