मुंबई : ऑस्ट्रेलियातील सनशाइन कोस्ट येथे आयोजित करण्यात आलेल्या ६६ व्या आंतरराष्ट्रीय गणित ऑलिम्पियाडमध्ये (आयएमओ २०२५) सहा विद्यार्थ्यांच्या भारतीय संघाने तीन सुवर्ण, दोन रौप्य आणि एक कांस्य अशा एकूण ६ पदकांची कमाई केली. विशेष बाब म्हणजे भारताने सर्व देशांमधून ७ वा क्रमांक पटकावून घवघवीत यश संपादन केले आहे. एकूण ११० देशांनी सहभाग घेतलेल्या या स्पर्धेत ६३० विद्यार्थी सहभागी झाले होते, यामध्ये ६९ मुलींचा समावेश होता.

यंदा ऑस्ट्रेलियातील सनशाइन कोस्ट येथे १० ते २० जुलै या कालावधीत ६६ व्या आंतरराष्ट्रीय गणित ऑलिम्पियाडचे (आयएमओ २०२५) आयोजन करण्यात आले होते. सहा विद्यार्थ्यांच्या भारतीय संघामध्ये दिल्लीतील कणव तलवार,आरव गुप्ता आणि महाराष्ट्रातील आदित्य मांगुडी वेंकट गणेश यांनी ‘सुवर्ण पदक’ पटकावले. कर्नाटकमधील एबेल जॉर्ज मॅथ्यू व दिल्लीतील आदिश जैन यांनी ‘रौप्य पदक’ आणि दिल्लीतील अर्चित मानस याने ‘कांस्य पदक’ पटकावले. या भारतीय संघाचे नेतृत्व दिल्लीतील इंडियन स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्यूटच्या प्रा. शांता लैशराम आणि सह – नेतृत्व बंगळुरूतील इंडियन स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्यूटच्या डॉ. मैनक घोष यांनी केले. तर अतुल शतावर्त नादिग आणि डॉ. रिजुल सैनी यांनी निरीक्षक म्हणून जबाबदारी सांभाळली.

दरम्यान, होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्र – टाटा मूलभूत संशोधन संस्था ही गणित, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र, खगोलशास्त्र, खगोल भौतिकशास्त्र यासह विविध विषयांच्या आंतरराष्ट्रीय ऑलिम्पियाडमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करण्यासाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देणारे नोडल केंद्र आहे. तर होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्राद्वारे घेण्यात येणाऱ्या राष्ट्रीय ऑलिम्पियाड परीक्षेच्या विविध टप्प्यांमधून अंतिम संघ निवडला जातो.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

भारताची आजवरची कामगिरी

आंतरराष्ट्रीय गणित ऑलिम्पियाडमध्ये १९८९ मध्ये पदार्पण केल्यानंतर भारतीय संघाने ३५ पैकी ७ वेळा ‘सर्वोच्च १०’ देशांमध्ये स्थान पटकावले आहे. तर करोनामुळे भारतीय संघ २०२० साली आंतरराष्ट्रीय गणित ऑलिम्पियाडमध्ये सहभागी झाला नव्हता. देशनिहाय पदतालिकेत भारताने १९९८ आणि २००१ सालातील कामगिरीची बरोबरी करून ‘आयएमओ’मध्ये ७ वे स्थान पटकावण्याची ही तिसरी वेळ आहे. यावर्षीच्या कामगिरीनुसार भारताने सलग तिसऱ्यांदा ‘आयएमओ’ स्पर्धेत ‘सर्वोच्च १०’मध्ये स्थान पटकावले आहे. तर इंग्लंडमधील बाथ शहरात आयोजित ६५ व्या आंतरराष्ट्रीय गणित ऑलिम्पियाडमध्ये (आयएमओ २०२४) भारताने चौथे स्थान पटकावून आजवरची सर्वोत्तम कामगिरी केली होती. तर ‘आयएमओ २०२३’मध्ये भारतीय संघ ९ व्या स्थानी होता.