मुंबई विमानतळावर आज सकाळी विमानातील कर्मचारी आणि वैमानिकाच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला. मुंबईहून चंदीगडकडे जाणारे इंडिगो विमानाच्या उड्डाणाच्या काही मिनिटे आधी एका प्रवाशाने डावीकडील आपत्कालीन दरवाजा उघडला. विमानातील कर्मचारी आणि वैमानिकाने प्रसंगवधानता राखून उड्डाण रोखले. यामुळे मोठा अनर्थ टळला. दरम्यान, विमानातील कर्मचाऱ्यांनी प्रवाशाला खाली उतरवले आणि पोलिसांच्या ताब्यात दिले.

इंडिगोचे विमान आज सकाळी मुंबई विमानतळावरून चंदीगडसाठी उड्डाण घेणार होता. सर्व प्रवासी विमानात चढले होते. काही मिनिटांनी विमान उड्डाण घेणार तोच एका प्रवाशाच्या विचित्र वर्तनामुळे गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. त्या प्रवाशाने विमानाच्या डावीकडील आपत्कालीन दरवाजा उघडला. यात एक प्रवासी जखमी झाला आहे. विमानातील कर्मचाऱ्यांची सतर्कता आणि वैमानिकाच्या प्रसंगवधानतेमुळे विमानाचे उड्डाण रोखण्यात आले. त्यामुळे मोठा अपघात टळला. या विमानात एकूण १७६ प्रवासी बसले होते. या घटनेनंतर विमानातील कर्मचाऱ्यांनी त्या प्रवाशाला खाली उतरवले आणि सुरक्षा रक्षकांच्या ताब्यात दिले. या प्रकरणी त्या प्रवाशाविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला असून, या घटनेची चौकशी सुरू आहे, असे इंडिगो कंपनीने म्हटले आहे.

इंडिगोचे 6E 4134 हे विमान मुंबईहून चंदीगडकडे उड्डाण करणार होते. सर्व प्रवासी विमानात बसले होते. काही मिनिटांतच मुंबई विमानतळावरून हे विमान उड्डाण घेणार होते. त्याचवेळी अचानक एका प्रवाशाने आपत्कालीन दरवाजा उघडला. विमानातील इंडिगोच्या कर्मचाऱ्यांच्या ही बाब लक्षात आली. त्यांनी याबाबत तत्काळ वैमानिकाला कळवले. वैमानिकाने उद्घोषणा करून घडलेल्या प्रकाराची माहिती विमानात चढलेल्या प्रवाशांना दिली. त्यानंतर विमानाचे इंजिन बंद केले. विमान कर्मचारी आणि वैमानिकाच्या सतर्कतेमुळे मुंबई विमानतळावरील संभाव्य दुर्घटना टळली. त्या प्रवाशाने अचानक आपत्कालीन दरवाजा आणि सरकते जीने उघडल्याने विमानातील एक प्रवासी जखमी झाला. याबाबत वैमानिकाने विमानतळावरील कर्मचाऱ्यांना कळवले. तसेच जखमीला तातडीने वैद्यकीय उपचार द्यावेत, अशा सूचना दिल्या. दरम्यान, आपत्कालीन दरवाजा उघडणाऱ्या प्रवाशाला सुरक्षा रक्षक आणि पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, या घटनेची चौकशी करण्यात येत आहे, अशी माहिती देण्यात आली आहे. इंडिगोने संबंधित प्रवाशाविरोधात गुन्हा नोंदवला आहे. विमानातील इतर प्रवाशांना झालेल्या त्रासाबद्दल दिलगीर आहोत, असे कंपनीने म्हटले आहे.