शीना बोरा हत्याकांडातील प्रमुख आरोपी इंद्राणी मुखर्जीला शुक्रवारी रात्री मुंबईतील जेजे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गेल्या अडीच वर्षांपासून तुरुंगात असलेल्या इंद्राणी मुखर्जीची प्रकृती शुक्रवारी रात्री अचानक बिघडली. त्यानंतर कारागृह प्रशासनाने तिला त्वरीत जेजे रुग्णालयात दाखल केले. इंद्राणी मुखर्जीला नेमके काय झाले आहे ते समजू शकलेले नाही. तिच्या वैद्यकीय चाचण्या करण्यात आल्या असून प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, बहुचर्चित शीना बोरा हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी आणि शीनाची आई इंद्राणी मुखर्जी व तिचा दुसरा व तिसरा पती अनुक्रमे संजीव खन्ना आणि पीटर मुखर्जी यांच्यावर विशेष सीबीआय न्यायालयाने शीनाच्या हत्येचा कट रचून तिची हत्या केल्याचा आरोप निश्चित केला आहे. तिघांनीही त्यांच्यावरील हा आरोप अमान्य केला आहे. इंद्राणी, संजीव आणि पीटर या तिघांवर शीनाच्या हत्येचा कट रचणे, तिचे अपहरण करणे, त्यानंतर तिची हत्या करणे, गुन्ह्याबाबत खोटी माहिती देऊन दिशाभूल करणे आणि पुराव्यांची विल्हेवाट लावणे असे मुख्य आरोप ठेवण्यात आले आहेत. याव्यतिरिक्त तिघांवर शीनाचा भाऊ मिखाईल याच्या हत्येचा प्रयत्न करण्याचा कट रचल्याचा आरोपही ठेवण्यात आला आहे. २४ एप्रिल २०१२ रोजी शीनाची हत्या करण्यात आली. ऑगस्ट २०१५ मध्ये इंद्राणीला शीनाच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आली.

तिचा माजी चालक आणि याप्रकरणी माफीचा साक्षीदार बनलेला श्यामवर राय याला पोलिसांनी सर्वप्रथम अटक केली होती. पीटरच्या पहिल्या पत्नीचा मुलगा राहुल आणि शीना यांच्यामधील प्रेमसंबंध पसंत नसल्याने ही हत्या करण्यात आल्याचा आरोप आहे. मालमत्तेचा मुद्दाही यात आहे.