मुंबई पोर्ट ट्रस्टच्या बंदरात प्रथमच आंतरराष्ट्रीय पंचतारांकित क्रूझचे आगमन; डिसेंबरपासून नियमित क्रूझ सेवा

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

एरवी मालाची वाहतूक करणाऱ्या जहाजांनी गजबजलेल्या मुंबई पोर्ट ट्रस्टच्या आंतरराष्ट्रीय टर्मिनलवर आज, शनिवारी एक पहाडी सौंदर्य नजरेस पडणार आहे. जर्मनीवरून मजलदरमजल करत आलेली तब्बल १८ मजले असलेली महाकाय आंतरराष्ट्रीय क्रूझ बोट शनिवारी पहाटे मुंबईत दाखल होत असून दोन हजार भारतीय पर्यटकांना घेऊन ती पुढच्या पर्यटन सफारीला निघणार आहे. मुंबईच्या समुद्रात प्रथमच अशा प्रकारची क्रूझ बोट दाखल होत असून तिच्या स्वागतासाटी मुंबई पोर्ट ट्रस्ट सज्ज झाले आहे.

‘गेटिंग ड्रीम’ नावाची ही क्रूझ शनिवारी पहाटेच्या सुमारास मुंबई पोर्ट ट्रास्टच्या आंतरराष्ट्रीय टर्मिनलवर येऊन स्थिरावेल. या सप्ततारांकित क्रूझची एकूण प्रवासी क्षमता ४ हजार असून यामधून २ हजार प्रवासी आज सायंकाळी ७ वाजता सफरीला निघणार आहेत. मुंबईकरांसह देशभरातून आलेल्या प्रवाशांचा यात समावेश असून ‘ग्रीन गेट’ येथे या क्रूझचे स्वागत करण्यात येणार असून या सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय रस्ते व जहाज बांधणी मंत्री नितीन गडकरी उपस्थित राहणार आहेत. प्रवाशांना घेऊन ही क्रूझ प्रथम कोलंबो व नंतर सिंगापूर येथे प्रयाण करणार आहे. मुंबईत प्रथमच एवढी मोठी बोट येणार असल्याने तिचे मुंबई पोर्ट ट्रस्टतर्फे जंगी स्वागत करण्यात येईल.

‘मुंबई पोर्ट ट्रस्ट’च्या आखत्यारीत सध्या बंदरात जहाजे उभी करण्यासाठी ७ मोठे ‘बर्थ’ असून यांचा वापर मुख्यत्वे मालवाहू जहाजांच्या आगमन व प्रस्थानासाठी करण्यात येत आहे. मात्र येथे येणाऱ्या मालवाहू जहाजांकडून ज्यादा महसूल मिळत असल्याने प्रवासी क्रूझ बोटींना दुय्यम स्थान दिले जात असे. तसेच त्यांना टर्मिनलमध्ये थांबण्यासाठीचे दरही महाग होते, मात्र ‘आंतरराष्ट्रीय क्रूझ पर्यटना’ला चालना मिळण्यासाठी ट्रस्टने एक मोठे ‘बर्थ’ बडय़ा क्रूझ बोटींसाठी राखीव ठेवण्याचा निर्णय घेतला असून त्यांना भराव्या लागणाऱ्या दरात ४० टक्के कपात केली आहे. तसेच २ एकराच्या जागेत एक मोठे अत्याधुनिक क्रूझ टर्मिनल बनवण्यात येत असून यासाठी १३० कोटी रुपयांचा खर्च करण्यात येणार आहे. तसेच येत्या डिसेबरपासून मुंबईतूनच जगातील अन्य देशांसाठी क्रूझ सेवा सुरू होणार असून त्या मुंबईहून निघून पुन्हा मुंबईत येणार आहेत. यासाठी ‘होम पोर्ट’चीही निर्मिती सुरू आहे. तसेच या ऑक्टोबर ते मे महिन्यांदरम्यान ‘गेंटिंग ड्रीम’ एवढय़ाच मोठय़ा ५९ क्रूझ मुंबईत येणार असून नजीकच्या वर्षांत अशा १०० क्रूझ येण्याची शक्यता आहे, अशी माहिती ‘मुंबई पोर्ट ट्रस्ट’चे अध्यक्ष संजय भाटिया यांनी दिली.

क्रूझ पर्यटनासाठी राष्ट्रीय समिती

संपूर्ण देशातच क्रूझ पर्यटनाला चालना मिळावी यासाठी राष्ट्रीय पातळीवर एका समितीची स्थापना करण्यात आली असून यात मुंबई, कोचिन, गोवा येथील पोर्ट ट्रस्टच्या अध्यक्षांचा समावेश आहे. भविष्यात या भारतीय शहरांना जोडणाऱ्या क्रूझ सेवा सुरू होतील. तसेच केंद्रीय जहाज बांधणी मंत्रालयान क्रूझ पर्यटनाचा ढाचा ठरवण्यासाठी आंतरराष्ट्रीय सल्लागाराचीही नेमणूक केली आहे. अशा अनेक क्रूझ मुंबईत येणार असल्याने त्यांच्यावर सागरी पोलिसांचेही लक्ष राहणार आहे, असे भाटिया म्हणाले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: International five star cruise arrivals in mumbai
First published on: 29-10-2016 at 03:42 IST