व्हिवा लाउंजमध्ये ‘माण एक्स्प्रेस’!

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दुसऱ्याचा विक्रम मोडून त्यावर आपले नाव कोरल्यावर निर्धास्त होणाऱ्या व्यक्तींमध्ये सहभागी होण्यापेक्षा सतत सर्वोत्तम कामगिरी करण्यासाठी झगडणाऱ्या ललिता बाबरशी मुक्त संवादाचा कार्यक्रम येत्या मंगळवारी दादरच्या सावरकर स्मारक सभागृहात रंगणार आहे. निमित्त आहे लोकसत्ता व्हिवा लाउंजच्या २७ व्या पर्वाचे. वेगवेगळ्या क्षेत्रात धडाडीने काम करून स्वतचा ठसा उमटवणाऱ्या कर्तृत्त्ववान स्त्रियांशी संवाद साधून त्यापासून इतरांना स्फूर्ती मिळावी या उद्देशाने लोकसत्ताने व्हिवा लाउंज हा उपक्रम सुरू केला. त्यामध्ये ललिताच्या रुपाने आंतरराष्ट्रीय धावपटू प्रेक्षकांना भेटणार आहे. केसरी प्रस्तुत आणि दिशा डायरेक्टच्या सहकार्याने होणारा हा कार्यक्रम सर्वासाठी खुला आहे.
सातारा जिल्ह्य़ातील माण तालुक्यातील मोही या खेडेगावात सामान्य शेतकऱ्याच्या पोटी जन्मलेल्या ललिताने २०१४च्या आशियाई स्पध्रेत ९ मिनिटे ३५.३७ सेकंदाची वेळ नोंदवून ३००० स्टीपलचेसमध्ये सुधा सिंग हिच्या नावावर असलेल्या राष्ट्रीय विक्रम मोडून कांस्यपदकाची कमाई केली. मात्र, याही कामगिरीवर ती समाधानी नव्हती. त्यामुळे कसून सराव करून ही वेळ आणखी कशी सुधारता येईल याकडे तिने लक्ष दिले. म्हणूनच २०१५च्या आशियाई अजिंक्यपद आणि जागतिक अ‍ॅथलेटिक्स स्पध्रेत तिने स्वत:चाच विक्रम दोन वेळा मोडीत काढला. त्यामुळे यापुढे तिच्याकडून आणखी चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे. अशा मैदानी स्पर्धा गाजवणाऱ्या व्यक्तीमत्वाशी गप्पा मारण्याची, तिचा प्रवास जाणून घेण्याची संधी मंगळवारी मिळणार आहे.

कधी –
मंगळवारी, ८ सप्टेंबर
वेळ –
संध्याकाळी ४.४५ वाजता
कुठे – स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक, शिवाजी पार्क, दादर (प.)
प्रवेश – विनामूल्य (प्रथम येणाऱ्यास प्राधान्य तत्त्वावर)

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Interview with lalita babar
First published on: 06-09-2015 at 04:48 IST