मुंबई : इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशनने (आयआरसीटीसी) मध्यमवर्गीय कुटुंबियांना परवडणारी आंतरराष्ट्रीय सहल योजना उपलब्ध केली आहे. मुंबईवरून युरोप, लंडन, श्रीलंका, बाली, नेपाळ या ठिकाणी कमी खर्चातील सहलीचे नियोजन केले आहे. त्यामुळे मध्यमवर्गीयांच्या पैशांची बचत होईल असा आशावाद व्यक्त करण्यात येत आहे.
आयआरसीटीसी, पश्चिम विभागाद्वारे देशांतर्गत, आंतरराष्ट्रीय सहल योजना आखण्यात आली आहे. नुकताच भारत सरकारच्या ‘देखो अपना देश’ आणि ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ या उपक्रमाच्या अनुषंगाने देशांतर्गत पर्यटनाला चालना देण्यासाठी भारत गौरव पर्यटक रेल्वे चालवण्यासाठी पुढाकार घेतला आहे. यासाठी विशेष पर्यटन रेल्वे योजना सुरू करण्यात आली आहे. आयआरसीटीसीतर्फे पर्यटन रेल्वे चालविण्यात येतात. आता मुंबईवरून आंतरराष्ट्रीय सहल योजनांचे नियोजन करण्यात आले आहे. आयआरसीटीसीने मध्यमवर्गीय कुटुंबियांच्या खर्चाचा विचार करून, त्यांच्या आवाक्यातील सहल योजनासाठी खास क्युरेटेड आंतरराष्ट्रीय पॅकेजेस सुरू केले आहे, असे आयआरसीटीसीच्या पश्चिम विभागाचे समुह महाव्यवस्थापक गौरव झा यांनी सांगितले.
आयआरसीटीसीने युरोपसह लंडन २६ जून २०२५ ते १० जुलै २०२५, श्री रामायण यात्रा श्रीलंका पॅकेज १६ ते २२ जून २०२५, बाली पॅकेज १४ ते १९ जुलै २०२५, नेपाळ सहल १२ ते १७ ऑगस्ट २०२५ असे सहलीचे नियोजन आहे. या सहल योजना किफायतशीर आणि सर्वसमावेशक आहे. त्यात विमानांच्या तिकिटांचा खर्च, जेवण, प्रवेश शुल्क, निवास, व्हिसा/परमिट, टूर गाइड, प्रवासी विमा आणि जीएसजी यांचा समावेश आहे.
या योजना तुलनेने कमी खर्चाच्या असतील. आयआरसीटीसी टुरिस्ट या संकेतस्थळावर या सहल योजना उपलब्ध आहेत. तसेच ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ या तत्त्वावर ऑनलाइन आरक्षण उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी पर्यटकांना आयआरसीटीसीच्या संकेतस्थळाला भेट देता येईल, असे आयआरसीटीसीच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
छत्रपती शिवाजी महाराजांना आदरांजली वाहण्यासाठी, त्यांच्या जीवनाशी संबंधित महाराष्ट्रातील सर्वात प्रतिष्ठित स्थळे पाहण्यासाठी, भारतीय रेल्वेने ‘भारत गौरव सर्किट यात्रे’द्वारे इतिहासप्रेमी, पर्यटकांना गड-किल्ल्यावर घेऊन जाण्याची सोय केली आहे. इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशनने (आयआरसीटीसी) ९ जून रोजी सहा दिवसीय सहलीचे आयोजन केले आहे. ज्यात पर्यटकांना, इतिहासप्रेमींना ऐतिहासिक किल्ले, मंदिरे, स्मारके यांना भेटी देण्याची संधी मिळणार आहे.