‘टीसीएस’कडून औरंगाबाद पोलीस ठाण्यात चार जणांविरुद्ध तक्रार

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मंगल हनवते, लोकसत्ता

मुंबई : म्हाडाच्या ऑनलाइन भरती परीक्षेतील गैरप्रकार, औरंगाबादमधील एका परीक्षा केंद्रावर संगणकीय प्रणालीत करण्यात आलेल्या फेरफाराबाबत एमपीएससी समन्वय समितीने केलेल्या आरोपात अखेर तथ्य आढळले आहे. टाटा कन्सल्टन्सी सव्‍‌र्हिसेसने (टीसीएस) औरंगाबादमध्ये परीक्षेत गैरप्रकार झाल्याचे मान्य केले असून औरंगाबादमधील क्रांती चौक पोलीस ठाण्यात चार जणांविरोधात तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीनुसार पोलीस तपास करीत आहेत.

म्हाडाच्या ५६५ पदाकसाठी डिसेंबरमध्ये होणारी परीक्षा ऐनवेळी गैरप्रकारामुळे रद्द करण्यात आली. याप्रकरणी अनेकांना पुणे सायबर पोलिसांकडून अटकही झाली आहे. या प्रकारानंतर सरकारच्या निर्देशानुसार म्हाडाने स्वत: टीसीएसच्या माध्यमातून परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला. जानेवारी, फेब्रुवारीदरम्यान ऑनलाइन पध्दतीने ही परीक्षा घेण्यात आली. मात्र या ऑनलाइन परीक्षेतही गैरप्रकार झाल्याचा, तोतया उमेदवार परीक्षा देत असल्याचा आरोप समन्वय समितीने केला होता. पण हे आरोप म्हाडाने फेटाळून लावले.

त्यानंतर समितीने औरंगाबाद येथील एका परीक्षा केंद्रावरील गैरप्रकार आणि संगणकीय प्रणालीत फेरफार केल्याचे पुरावेच म्हाडाला सादर केले. यासंबंधीचे सविस्तर वृत्त ‘लोकसत्ता’ने प्रसिद्ध केले होते. या वृत्ताची दखल घेत म्हाडाने औरंगाबादप्रकरणी टीसीएसकडून स्पष्टीकरण मागविले होते.

म्हाडाच्या निर्देशानुसार टीसीएसने सर्व पुराव्यांचा तपास करुन आपला अहवाल म्हाडाला सादर केला. या अहवालातून अखेर औरंगाबादमध्ये परीक्षा केंद्रात गैरप्रकार झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यानुसार ४ एप्रिलला क्रांती चौक, औरंगाबाद पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

मोरया इन्फोटेक परीक्षा केंद्राचा मालक महेश शिंगारे, पर्यवेक्षक प्रवीण चव्हाण आणि विनोद चव्हाण तसेच परीक्षार्थी अनिल राठोड या चार जणांविरोधात पोलीस तक्रार दाखल केली आहे. म्हाडाचे सचिव राजकुमार सागर यांनी याला दुजोरा दिला.

सखोल चौकशी व्हावी

खासगी परीक्षा केंद्रांवर परीक्षा घेतल्यामुळे हा गैरप्रकार झाला आहे. याचे पुरावे आमच्याकडे होते म्हणून ही बाब उघड झाली. पण असे गैरप्रकार इतरही केंद्रांवर झाल्याचे नाकारता येत नाहीत. त्यामुळे आता पोलिसांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करुन या प्रकाराच्या मुळाशी जाण्याची गरज आहे. या गैरप्रकाराच्या पार्श्वभूमीवर आता मुख्य परीक्षा घेण्याची गरजही अधोरेखीत झाली आहे. म्हाडाने मुख्य परीक्षा घ्यावी हीच आमची मागणी आहे.          

राहुल कवठेकर, अध्यक्ष, एमपीएससी समन्वय समिती

परीक्षेच्या चार दिवस आधीच गैरकृत्य

टीसीएच्या तक्रारीनुसार ज्या पदासाठी ९ फेब्रुवारीला कनिष्ठ लिपिक पदासाठी दुपारी ४ ते ६ या वेळेत परीक्षा होणार होती. या परीक्षेला बसणारा विद्यार्थी, केंद्र मालक आणि अन्य काही व्यक्त ५ फेब्रुवारीलाच (परीक्षा नसलेल्या दिवशी) दुपारी ४ वाजून ३ मिनिटांनी औरंगाबादच्या संबंधित केंद्रावर गेले. केंद्रात गेल्यानंतर सीसी टीव्ही कॅमेरा बंद करुन संगणकीय प्रणालीत फेरफार करताना निदर्शनास आले. समन्वय समितीने सादर केलेल्या ९ फेब्रुवारीच्या सीसी टीव्ही कॅमेरातील चित्रणात हाच विद्यार्थी परीक्षा देत असल्याचे निदर्शनास आले. तसेच तो पर्यवेक्षकाशी सल्लामसलत करतानाही दिसल्याचेही या तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Irregularities in mhada s online recruitment exam zws
First published on: 19-04-2022 at 01:45 IST