भारतात परतल्यास आपल्याला अटक केली जाणार नाही आणि दोषी ठरवेपर्यंत कारागृहात पाठवले जाणार नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने लेखी दिले तरच मी भारतात परतेन, तेही आजच परतेन, असा दावा इस्लाम धर्मप्रचारक डॉ. झाकीर नाईक याने केला आहे. नाईक याने मंगळवारी प्रसिद्धीपत्रक जारी केले त्यात अशी मागणी करत परतण्याचा दावा केला आहे.

आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) नाईक याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तसेच त्याच्याविरोधात ‘रेड कॉर्नर’ नोटीस बजावली जावी यासाठी ‘ईडी’कडून प्रयत्न सुरू आहेत. प्रसिद्धीपत्रकात त्याने ‘ईडी’ त्यांच्या राजकीय नेत्यांच्या आदेशानुसार आपल्याला फसवण्यासाठी उतावीळ झाल्याचा आरोप केला आहे. भारतीय तपास यंत्रणा त्यांच्या राजकीय नेत्यांच्या आदेशांची अंमलबजावणी करण्यास एवढय़ा उतावीळ का झाल्या आहेत? असा सवालही त्याने केला आहे. त्यांचा हा उतावीळपणा लज्जास्पद आहे. त्यांच्या तपासाची दिशा सतत बदलत आहे. दहशतवादावरून आता त्यांचा तपास आर्थिक गैरव्यवहारावर येऊन थांबला आहे. यातूनच त्यांची राजकीय नेत्यांच्या आदेशाच्या अंमलबजावणीची धडपड दिसून येत आहे. कुठल्याही खटल्याविना आणि आपली बाजू ऐकल्याविना आपल्याला तुरुंगात टाकण्यासाठी  धडपड सुरू आहे. परंतु आपल्याला अटक केली जाणार नाही आणि दोषी ठरवेपर्यंत कारागृहात पाठवले जाणार नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने लेखी आश्वासन दिले तर मी भारतात परतण्यास तयार असल्याचा दावा नाईक याने केला. भारतीय सरकारने आपल्यावर लावलेले आरोप इंटरपोलने मान्य करण्यास नकार दिलेला आहे. आपल्या सुदैवाने आंतरराष्ट्रीय पातळीवर भारतीय तपास यंत्रणांच्या प्रयत्नांना अपयश आले आहे, असेही त्याने या पत्रकात म्हटले आहे.