वादग्रस्त मुस्लिम धर्मप्रचारक झाकीर नाईकचे वडील अब्दूल करीम नाईक यांचे रविवारी सकाळी निधन झाले. शिक्षणतज्ज्ञ आणि डॉक्टर म्हणून ओळखले जाणारे नाईक हे ८७ वर्षांचे होते. ह्रदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले आहे. वडिलांच्या निधनानंतर झाकीर नाईक भारतात येण्याची शक्यता आहे.

अब्दूल नाईक यांचा जन्म महाराष्ट्रातील रत्नागिरी येथे झाला होता. व्यवसायाने डॉक्टर असलेले नाईक हे बॉम्बे मानसोपचार सोसायटी या मानसोपचार क्षेत्रातील तज्ज्ञांच्या संस्थेचे ते अध्यक्षदेखील होते. १९९४ ते ९५ या कालावधीत ते या संघटनेचे अध्यक्ष होते. अब्दूल नाईक हे शिक्षण क्षेत्रातही कार्यरत होते. गेल्या काही महिन्यांपासून आजाराने ग्रासले होते. रविवारी पहाटे अब्दूल नाईक यांना ह्रदयविकाराचा झटका आला. यात त्यांची प्राणज्योत मालवली असे नाईक कुटुंबीयांच्या निकटवर्तीयांनी सांगितले. अब्दूल नाईक यांच्यावर माझगावमधील दफनभूमीत अंत्यविधी  होतील असेही सूत्रांनी सांगितले.

वडिलांच्या निधनानंतर झाकीर नाईक दफनविधीसाठी भारतात येणार का याकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. मात्र झाकीर नाईक ऐवढ्या लवकर भारतात पोहोचू शकणार नाही. पण श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी ते लवकरच भारतात येतील असे इस्लामिक रिसर्च फाऊंडेशन या संस्थेतील सक्रीय सदस्याने सांगितले. बांगलादेशमधील ढाका येथे इसिस समर्थक दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. यातील दोन दहशतवाद्यांनी झाकीर नाईकचे भाषण ऐकून प्रभावित झालो होतो अशी कबुली दिली होती. तेव्हापासून झाकीर नाईक भारतातील तपास यंत्रणांच्या रडारवर आहे. चौकशीचा ससेमिरा चुकवण्यासाठी झाकीर नाईकने देशाबाहेर राहणेच पसंत केले आहे. आता वडिलांच्या निधनानंतर तो भारतात येण्याची शक्यता आहेत. त्यामुळे तपास यंत्रणाही सर्तक झाल्या आहेत.