मुंबई : आयटीआयचे शिक्षण घेणारे विद्यार्थी सक्षम उद्योजक व्हावेत यासाठी आयटीआय संस्थांमध्ये अल्प मुदतीचा व्यवस्थापन अभ्यासक्रम शिकविण्याचा निर्णय घेतल्याची माहिती कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी बुधवारी दिली. या अभ्यासक्रमांना आयटीआयमध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांबरोबरच अन्य विद्यार्थीही प्रवेश घेता येणार आहे. व्यवस्थापन अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेला १५ सप्टेंबरपासून सुरुवात होणार आहे.

आयटीआयच्या राज्यभरातील संस्थांमध्ये शिक्षण घेत असलेले विद्यार्थ्यांनी स्वयंरोजगार सुरू करावा यासाठी कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत नुकतेच महाराष्ट्र स्टार्टअप, उद्योजकता व नाविन्यता धोरण २०२५ जाहीर केले. त्याचवेळी अनेक विद्यार्थ्यांना व्यवस्थापनाचे योग्य शिक्षण नसल्याने व मार्गदर्शनही मिळत नसल्याने त्यांनी उद्योग सुरू केला तरी तो यशस्वीपणे चालवताना अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे राज्यातील मराठी मुले सक्षम उद्योजक व्हावीत यासाठी त्यांच्याकडे कौशल्य शिक्षणाबरोबरच व्यवस्थापनाचेही ज्ञान असणे गरजेचे आहे.

ही बाब लक्षात घेत कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाने आयटीआयच्या सर्व संस्थांमध्ये अल्प मुदतीचे व्यवस्थापन अभ्यासक्रम सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये बिझिनेस ॲनालिटिक्स (व्यवसाय विश्लेषण), मार्केटिंग मॅनेजमेंट (विपणन व्यवस्थापन), प्रोडक्शन मॅनेजमेंट (उत्पादन व्यवस्थापन), फायनान्शियल मॅनेजमेंट (आर्थिक व्यवस्थापन) आणि बिहेविरियल मॅनेजमेंट (वर्तणुकीय व्यवस्थापन) हे पाच नवे अभ्यासक्रम अल्प मुदतीचे सुरू करण्यात येणार आहेत. हे अभ्यासक्रम आयटीआयच्या विद्यार्थ्यांसाठी ऐच्छिक असणार आहेत.

व्यवस्थापन अभ्यासक्रमासह २० अल्पमुदतीचे अभ्यासक्रम सुरू होणार

आयटीआय संस्थांमध्ये विद्यार्थ्यांना अधिक चांगल्या प्रकारचे प्रशिक्षण मिळावे यासाठी व्यवस्थापन विषयाच्या पाच अभ्यासक्रमासह २० नवे अल्पमुदतीचे अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहेत. यामध्ये सॉफ्ट स्किलचे पाच, सेवा क्षेत्रातील पाच आणि न्यू एजचे पाच नवे अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहे. हे सर्व अभ्यासक्रम १५ सप्टेंबरपासून सुरू करण्यात येणार आहेत. यातील न्यू एज अभ्यासक्रमासांठीच्या प्रवेश प्रक्रियेला ६ ऑगस्टपासून सुरुवात करण्यात आली आहे. न्यू एज अभ्यासक्रमाची गुणवत्ता यादी १२ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५ वाजता जाहीर करण्यात येईल. तसेच निवड यादी १३ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५ वाजता जाहीर करण्यात येईल. निवड यादीत प्रवेशाची संधी मिळालेल्या विद्यार्थ्यांना १४ ते १९ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत प्रत्यक्ष महाविद्यालयात जाऊन प्रवेश घ्यायचा आहे.

आयटीआय व्यतिरिक्त विद्यार्थ्यांनाही प्रवेशाची संधी

आयटीआय संस्थांमध्ये सुरू करण्यात येणाऱ्या व्यवस्थापन अभ्यासक्रम हे संस्थेतील विद्यार्थ्यांना शिकविण्यात येणार आहे. त्याचबरोबर या विद्यार्थ्यांना अन्य विद्यार्थ्यांनाही प्रवेश घेता येणार आहे. अन्य विद्यार्थ्यांना या अभ्यासक्रमासाठी पाच हजार शुल्क आकरण्यात येणार असून, या प्रवेशासाठी ४० वर्षाची अट ठेवण्यात आली आहे.