चेंबूर ते वडाळा हे सरासरी पाऊण तासांचे अंतर मोनोरेलमुळे अवघ्या १९ मिनिटांत कापता येईल.
चेंबूर ते वडाळा या ८.८ किलोमीटर लांबीच्या मार्गावरील मोनोरेल प्रवासी सेवेत दाखल होण्यासाठी अत्यावश्यक असलेल्या सुरक्षा प्रमाणपत्राच्या प्रक्रियेचा महत्त्वाचा टप्पा पार पडला आहे. निवृत्त सुरक्षा आयुक्तांनी सर्व तपासण्याकरून मोनोरेल सुरू करण्यास हिरवा कंदील दाखवला असून मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने राज्य सरकारकडे अहवाल पाठवला आहे. आता मोनोरेल कार्यान्वित होण्याचा मार्ग मोकळा झाला असून प्रतीक्षा आहे ती राज्य सरकारच्या परवानगीची. ती मिळताच येत्या काही दिवसांत देशातील पहिली मोनोरेल मुंबईकरांच्या सेवेत दाखल होईल.
पहिल्या टप्प्यात मोनोरेलची सेवा चेंबूर ते वडाळा या ८.८ किलोमीटर लांबीच्या मार्गावर सुरू होणार आहे. नंतर दुसऱ्या टप्प्यात वडाळा ते संत गाडगे महाराज चौक या ११.२ किलोमीटरच्या मार्गावर मोनोरेल सुरू होईल. पहिल्या टप्प्यात चेंबूर, आर. सी. मार्ग, आरसीएफ वसाहत, भारत पेट्रोलियम, म्हैसूर कॉलनी, भक्ती पार्क, वडाळा अशी सात स्थानके आहेत. चार डब्यांच्या मोनोरेलची प्रवासी क्षमता ५६८ इतकी आहे.
मोनोरेल सुरू करण्यापूर्वी त्यास सुरक्षा प्रमाणपत्र मिळणे बंधनकारक आहे. या सुरक्षाविषयक तपासणीसाठी महाराष्ट्र सरकारने माजी रेल्वे सुरक्षा आयुक्तांची नेमणूक सुरक्षा प्रमाणपत्र प्राधिकरण (अभियंता) म्हणून केली होती. त्यानुसार मोनोची स्थानके, त्यावरील उपकरणे, वीजपुरवठा, कारडेपोची माहिती, सिग्नल यंत्रणा, अग्निशमन व्यवस्थेसह इतर सुरक्षा यंत्रणा आदींची तपशीलवार छाननी करून मोनोरेल प्रवासी वापरासाठी सुरू करण्यास हिरवा कंदील दाखवला. आता राज्य सरकारने अधिसूचना काढताच मोनोरेल मुंबईकराच्या सेवेत दाखल करण्यात येईल, असे ‘एमएमआरडीए’च्या अधिकाऱ्यांनी सांगितले. जानेवारी संपण्यापूर्वीच मोनोरेल सुरू होण्याची अपेक्षा आहे.
नूतन वर्षी ‘मोनो रेल’ धावण्यास सज्ज!
मोनो आपत्कालीन चाचणीतून पार
मोनोरेल स्थानकांसाठी युद्धपातळीवर ‘सॅटिस’ची लगबग!