‘भारतातील युद्धशास्त्राची उपेक्षा’, ‘चिनी राज्यक्रांती’, ‘युगप्रवर्तनाच्या उंबरठय़ावरचे अरब जग’ या आणि अशा अनेक ग्रंथांचे लेखक आणि पत्रकार ज. द. जोगळेकर यांचे शुक्रवारी संध्याकाळी वयाच्या ९५व्या वर्षी निधन झाले.
मलबार हिल येथील एलिझाबेथ रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. स्वातंत्र्यवीर सावरकरप्रेमी पत्रकार, अशीही त्यांची ओळख होती. त्यांच्या पश्चात एक मुलगा आणि एक मुलगी असा परिवार आहे. अमेरिकेत स्थायिक असलेली त्यांची मुले परतल्यानंतरच त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येतील.
मूळचे बडोद्याचे असलेले जयवंत जोगळेकर सुरुवातीच्या काळात द बॉम्बे क्रॉनिकल या वृत्तपत्रात उपसंपादक होते. त्यानंतर ते मुंबई महापालिकेच्या बेस्ट उपक्रमात संपर्क अधिकारी म्हणून कार्यरत होते. १९६२च्या चीन युद्धावेळी त्यांनी ‘नवशक्ति’च्या रविवारच्या अंकांतून ‘युद्धशास्त्राची उपेक्षा’ ही लेखमाला लिहिली. त्याचेच पर्यवसान नंतर ‘भारतीय युद्धशास्त्राची उपेक्षा’ या ग्रंथात झाले. त्यांचा हा ग्रंथ एवढा गाजला की, या ग्रंथातील सिद्धांताला महादेवशास्त्री जोशी यांच्या संस्कृती कोशात स्थान मिळाले.
पत्रकार दि. वि. गोखले यांचे मित्र असलेल्या जोगळेकर यांनी विविध विषयांवर ३० अभ्यासपूर्ण ग्रंथ लिहिले. ‘एका हिंदुत्वनिष्ठाची आत्मकथा’ हे त्यांचे आत्मचरित्र त्यांच्या वयाच्या ९२व्या वर्षी प्रकाशित झाले होते.
हिंदुत्वाचे खंदे भाष्यकार अशी ओळख असलेल्या ज. द. जोगळेकर यांनी ‘जगातील इस्लामी समाजाची हालहवाल’, ‘अफगाणिस्तानात तालिबानचा पराभव’ हे विषयही आपल्या अभ्यासपूर्ण ग्रंथांमधून हाताळले होते. विशेष म्हणजे आपली डॉक्टर पत्नी डॉ. शोभा जोगळेकर यांचे व्यक्तिचित्रण करणारे ‘डॉ. शोभा जोगळेकर-एका तपस्विनीची कथा’ हे व्यक्तिचित्रणात्मक पुस्तकही त्यांनी लिहिले होते.
ज. द. जोगळेकर यांच्या कर्तृत्वाची दखल घेत १९९८मध्ये त्यांना स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाने पुरस्कार देऊन सन्मानित केले.
ज्येष्ठ पत्रकार आणि महाराष्ट्र टाइम्सचे तत्कालीन संपादक गोविंदराव तळवलकर यांनी त्यांचे वर्णन ‘चालताबोलता संदर्भग्रंथ’ असे केले होते.
जीवनपट
ज. द. जोगळेकर यांचा जन्म ७ ऑक्टोबर १९२१ रोजी मुंबईतील चिखलवाडी येथे झाला. ते सहा महिन्यांचे असताना वडिलांनी त्यांना बडोद्याला नेले. सयाजीराव गायकवाडांच्या या संस्थानात जोगळेकर यांच्या वडिलांनी शिक्षण खात्यात नोकरी मिळवली. त्यामुळे जयवंतरावांचे शालेय शिक्षण बडोद्यात झाले. शालेय शिक्षणातील पाठय़पुस्तकांशिवाय इतर पुस्तके वाचण्याचा छंदही त्यांना लहानपणापासूनच होता. पुढील शिक्षणासाठी जयवंतरावांनी पुण्यातील फग्र्युसन महाविद्यालयात प्रवेश घेतला. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात त्यांनी मुख्य नेत्यांबरोबरच विविध देशांच्या जनरल्सचाही अभ्यास केला. त्याशिवाय १९५२मध्ये ते मित्रांकडून पैसे उसने घेऊन युरोपला गेले. लंडनमध्ये त्यांनी आंतरराष्ट्रीय कायद्याचा एका वर्षांचा अभ्यासक्रम पूर्ण केला. ३ मे १९५७ रोजी ते बेस्ट उपक्रमात रुजू झाले. जनसंपर्क अधिकारी म्हणून त्यांनी तब्बल २१ वर्षे बेस्टमध्ये काम केले. दोनच वर्षांपूर्वी त्यांच्या ‘समीक्षा-संचित’ या पुस्तकाचे प्रकाशन झाले होते.
ग्रंथसंपदा
भारतातील युद्धशास्त्राची उपेक्षा, चिनी राज्यक्रांती, अफगाणिस्तानात तालिबानचा पराभव, अमेरिकन क्रांती, इंग्रजांच्या दृष्टिकोनातून १८५७चा प्रस्फोट, एका हिंदुत्वनिष्ठाची आत्मकथा (आत्मचरित्र), जगातील इस्लामी समाजाची हालहवाल, जागतिक राष्ट्रवादाचे प्रवाह नि हिंदुस्थान, दोन युद्धे, निधर्मी राष्ट्रवादाचे शिल्पकार, पहिले क्रुसेड, पुनरुत्थान, फ्रेंच राज्यक्रांती, भारतातील युद्धशास्त्राची उपेक्षा, युगप्रवर्तनाच्या उंबरठय़ावरचे अरब जग, रशियन राज्यक्रांती, समीक्षा-संचित (निवडक ६३ ग्रंथपरीक्षणांचा संग्रह), साम्यवादी देशातील फेरफटका, सेक्युलॅरिझम, स्वातंत्र्यवीर सावरकर एक वादळी जीवन, हिंदुत्व, हिंदुत्व आणि इतर विचारधारा, हिंदुत्ववादी धुरंधर नेते, हिंदुस्थान पाकिस्तान-वैचारिक संघर्षांची प्रतीके, हिंदुस्थानचे राष्ट्रीयत्व, हिंदुहृदयसम्राट स्वातंत्र्यवीर सावरकर, हिंदू राष्ट्रवादाचे स्रोत, हिंदूंच्या भवितव्याचा शोध, ज्ञानयुक्त क्रांतियोद्धा (सावरकरांचे चरित्र).