न्यायालयाची जयदेव यांना चपराक

प्रकृती अस्वास्थ्याच्या कारणास्तव प्रकरणाची सुनावणी तहकूब करण्याच्या विनंतीवरून दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या इच्छापत्राच्या वैधतेला आव्हान देणारा त्यांचा मुलगा जयदेव यांना उच्च न्यायालयाने  चपराक लगावली. सुनावणी तुमच्या मर्जीनुसार चालणार नाही, असे न्यायालयाने जयदेव यांच्या वकिलांना सुनावत  सुनावणी तहकूब करण्याची मागणी फेटाळून लावली.

ऐश्वर्य हा माझा मुलगा नाही, असा गौप्यस्फोट जयदेव यांनी बुधवारच्या उलटतपासणीत केल्यानंतर प्रकरणाची सुनावणी न्यायालयाने ‘इन-कॅमेरा’ केली होती. गुरूवारी सुरूवातीला १० मिनिटांसाठी सुनावणी सगळ्यांसाठी खुली करून पुन्हा ‘इन-कॅमेरा’ करण्यात आली. त्यावेळेस जयदेव यांची प्रकृती ठीक नसल्याचे सांगत त्यांच्या वकील सीमा सरनाईक यांनी प्रकरणाची सुनावणी तहकूब करण्याची विनंती न्यायालयाकडे केली. मात्र दोन दिवसांपूर्वीही तुम्ही हीच विनंती केली होती. त्या वेळेसही ही विनंती फेटाळण्यात आली होती. आता पुन्हा तीच विनंती करण्यात येत असून सुनावणी तहतूब करणे शक्य नसल्याचे न्यायमूर्ती गौतम पटेल यांनी स्पष्ट केले. ही बाब लक्षात घेऊनच जयदेव यांच्या उलटतपासणीची तारीख निश्चित करण्यात आली होती. त्यामुळे आता सुनावणी तहकूब करता येऊ शकत नाही. जयदेव यांच्या मर्जीनुसार न्यायालय काम करत नाही. आमच्यापुढे १३२ इच्छापत्राच्या वादाची प्रकरणे प्रलंबित आहेत. त्यामुळे त्यांची प्रकरणे प्रलंबित ठेवून या प्रकरणाला महत्त्व का दिले जात असल्याची विचारणा केली तर त्याला जबाबदार कोण, असा सवालही न्यायालयाने केला. दरम्यान, शुक्रवारीही जयदेव यांची उद्धव ठाकरे यांच्या वकिलांकडून उलटतपासणी सुरू राहणार आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.