राज्याचे गृहनिर्माण मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी मनसे प्रमुख राज ठाकरेंवर जोरदार शाब्दिक हल्ला चढवला. राज ठाकरे यांनी शरद पवार यांना छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेताना कधी ऐकलं नाही, असं म्हणत राज ठाकरेंनी टीका केली होती. त्याला प्रत्युत्तर देताना जितेंद्र आव्हाड यांनी राज ठाकरेंना प्रतिप्रश्न केला. चैत्यभूमीपासून अगदीजवळ राहत असूनही आजवर राज ठाकरे चैत्यभूमीवर का नाही गेले? असा सवाल आव्हाडांनी केला. ते आज (२ मे) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रदेश कार्यालयात माध्यमांशी संवाद साधत होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जितेंद्र आव्हाड म्हणाले, “तरुणांमध्ये चुकीचा इतिहास जात आहे. राज ठाकरे शरद पवार यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेतले नाही, असा आरोप करतात, पण चैत्यभूमीपासून अगदीजवळ राहत असूनही आजवर राज ठाकरे चैत्यभूमीवर का नाही गेले? शाहू-फुले-आंबेडकरांचे नाव का घेत नाहीत? असा प्रतिप्रश्न आव्हाड यांनी विचारला.

“पुरंदरेंनी इतिहास नाही, तर कांदबरी लिहिली”

“भारतात ज्यांनी खरोखर इतिहास लिहिला त्यांची खूप मोठी परंपरा आहे. अनेक ब्राह्मण लेखकांनी इतिहास लिहिला आहे, त्यावर आमचा आक्षेप नाही, पण पुरंदरेंनी इतिहास नाही, तर कांदबरी लिहिली आहे. कांदबरी इतिहास नसते. इतिहास हा जातीचा, धर्माचा नसतो,” असे आव्हाड म्हणाले.

“…मग हे सर्व साहित्यिक विकले गेले होते का?”

पुरंदरे यांच्या जातीवरुन राज ठाकरे यांनी केलेल्या आरोपाला उत्तर देताना जितेंद्र आव्हाड म्हणाले, “शरद पवार यांनी कधीही जातीभेद केला नाही. कुसुमाग्रज यांच्या नावावरुन दिला जाणारा पुरस्कार सुरू करण्यासाठी शरद पवार यांनी पुढाकार घेतला होता. विरोधी पक्षात असतानाही शरद पवारांना अनेक साहित्य संमेलनाचे उद्घाटक म्हणून साहित्यिकांनी बोलावले होते. मग हे सर्व साहित्यिक विकले गेले होते का?”

“अनेक ब्राह्मण नेत्यांसोबत शरद पवारांचे जिव्हाळ्याचे संबंध, पण…”

“एस. एम. जोशीपासून अनेक ब्राह्मण नेत्यांसोबत शरद पवारांचे जिव्हाळ्याचे संबंध होते. पण मुद्दामहून अपप्रचार करुन महाराष्ट्र पेटवण्याचे कारस्थान काही लोक करत आहेत,” अशी टीकाही जितेंद्र आव्हाड यांनी केली. पुरंदरेंच्या साहित्याला ज्ञानपीठ का नाही मिळाला? किंवा ऐतिहासिक लिखाणाबद्दल त्यांना एकाही विद्यापीठाने डॉक्टरेट का नाही दिली? असा प्रश्नही आव्हाड यांनी उपस्थित केले.

“चुकीचा इतिहास तरुणांच्या माथी मारून महाराष्ट्र पेटवण्याचा प्रयत्न”

“राजकीय पुढाऱ्यांनी समाजातील महागाई, गरिबी, रोजगार, शेतकऱ्यांबद्दल बोलले पाहिजे. पण काही नेते हे विषय सोडून विनाकारण चुकीचा इतिहास सांगून तरुणांच्या माथी मारून महाराष्ट्र पेटवण्याचा प्रयत्न करत आहेत. हा प्रयत्न आम्ही कधी यशस्वी होऊ देणार नाही,” असा स्पष्ट इशारा जितेंद्र आव्हाड यांनी दिला.

“भोंग्यावर बोलायचं असेल तर बोला, पण इतिहासाला हात घालू नका”

औरंगाबादमधील सभेत राज ठाकरे यांनी केलेल्या प्रत्येक आरोपाला जितेंद्र आव्हाड यांनी ऐतिहासिक दाखले आणि संदर्भ देऊन प्रतिवाद केला. तुम्हाला भोंग्यावर बोलायचं असेल तर बोला, पण इतिहासाला हात घालू नका, असे थेट आव्हानही जितेंद्र आव्हाड यांनी दिले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीवरुन राज ठाकरे यांनी वाद सुरू केला यावर जितेंद्र आव्हाड यांनी ऐतिहासिक दाखले देऊन महाराजांची समाधी ही छत्रपती संभाजी महाराजांनी बांधली असल्याचे सांगितले.

“फुलेंनी समाधीच्या जीर्णोद्धारासाठी पहिली सभा घेतली”

जितेंद्र आव्हाड म्हणाले, “१८६९ साली महात्मा ज्योतिबा फुले यांनी रायगडावर जाऊन समाधीस्थळी स्वच्छता केली. त्याची बातमी नारायण मेघजी लोखंडे यांनी दीनबंधू वर्तमानपत्रात छापून आणली होती. फुलेंचा पत्रव्यवहार, शाहू महाराजांचा पत्रव्यवहार आजही आर्काईजमध्ये उपलब्ध आहे. फुलेंनी समाधीच्या जीर्णोद्धारासाठी पहिली सभा घेतली होती, त्या सभेला करवीर संस्थानचे प्रमुख आबासाहेब घाटगे उपस्थित होते. आबासाहेबांनी त्यांचे अभियंते रायगडावर पाठवले देखील होते. मात्र सहा महिन्यातच त्यांचे निधन झाले.”

“लोकमान्य टिळक फक्त दोन वेळा रायगड किल्ल्यावर गेले”

“कालांतराने महात्मा फुलेंचेही निधन झाल्यामुळे ही मोहीम थांबली. त्यानंतर १८९५ साली टिळकांनी हे काम हाती घेतले. त्यावेळचे सर्व संस्थानिकांना त्यांनी सोबत घेतले. लोकमान्य टिळक हे फक्त दोन वेळा रायगड किल्ल्यावर गेले होते, असे इतिहासात नमूद आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे छायाचित्र नसल्यामुळे त्यांनी नाना फडणवीसांचे छायाचित्र सिंहासनावर ठेवल्याचा ऐतिहासिक संदर्भ आहे. १९२० साली टिळकांचे निधन झाले, तोपर्यंत समाधीसाठी काहीही काम झाले नव्हते. त्यांनी समाधी जीर्णोद्धार समिती स्थापन केली होती, त्यासाठी निधी गोळा केला होता. मात्र तो निधी ज्या बँकेत ठेवला होता, ती बँक बुडाल्याचे सांगितले गेले,” असं जितेंद्र आव्हाड यांनी सांगितलं.

हेही वाचा : जेम्स लेन प्रकरणावरुन आव्हाडांचा राज ठाकरेंवर निशाणा; म्हणाले, “बाबासाहेब पुरंदरे फिलॉसॉफर नव्हते, त्यांच्या मृत्यूनंतर आम्ही… “

“चुकीचा इतिहास सांगूनच आमचे वाटोळे केले”

जितेंद्र आव्हाड पुढे म्हणाले, “समाधी जीर्णोद्धार समिती काम करत नसल्यामुळे १९२६ साली ब्रिटिशांनी समाधीच्या जीर्णोद्धाराचे काम स्वतःकडे घेतले. या इतिहासावर मी कुणाशीही चर्चा करण्यासाठी तयार आहे. वर्तमान इतिहासकारांनाही हे संदर्भ माहीत आहेत. इतिहास असा कुणाच्याही नावावर खपवता येत नाही. चुकीचा इतिहास सांगूनच आमचे वाटोळे केले.”

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Jitendra awhad ask raj thackeray why he yet not visit chaityabhumi near his home in mumbai pbs
First published on: 02-05-2022 at 22:04 IST