ज्या कंपनीला पेपरचं काम देण्यात आलं होतं, त्याचा मालक सापडला. पोलिसांनी त्याचा लॅपटॉप तपासला असता त्यामध्ये काही प्रश्नपत्रिका आढळल्या. पोलिसांनी तात्काळ कारवाई केली आणि म्हाडाच्या अधिकाऱ्यांनी परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला, अशी माहिती जितेंद्र आव्हाड यांनी दिली. “या संपूर्ण प्रकारामुळे गोपनीयतेचा भंग झालाय, यामुळे लाखो विद्यार्थ्यांच्या भवितव्यावर परिणाम होऊ शकतो, ज्यांच्या हुशारीला न्याय मिळाला पाहिजे त्यांना मिळणार नाही, अशी शंका उपस्थित केली गेली. त्यानंतर म्हाडाच्या अधिकाऱ्यांनी बैठक घेऊन परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला. पेपर झाल्यानंतर जर पेपर फुटल्याचं समोर आलं असतं तर आम्हाला तोंड दाखवायला जागा उरली नसती,” अशी माहिती आव्हाड यांनी पत्रकार परिषद घेत दिली.

“आज पेपर रद्द केला म्हणून अनेक जण टीका करत आहेत, पण भविष्याच्या दृष्टीने महाराष्ट्रात कार्यरत पेपर फोडणाऱ्या टोळीला उद्ध्वस्त करावे लागेल. या पेपरबद्दल केवळ एकाच व्यक्तीला माहित होतं आणि त्याच व्यक्तीने पेपर फोडला,” असं आव्हाड म्हणाले. “म्हाडाने तक्रार केल्यानंतर पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे. जो पेपर संबंधित व्यक्तीला नष्ट करण्यास सांगितलं होतं, तोच पेपर त्याच्या लॅपटॉपमध्ये आढळला असून हा प्रकार म्हणजे गोपनीयतेचा भंग आहे. यासंदर्भात संबंधित व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महाराष्ट्रातील सर्वच परीक्षांचे दलाल एकाच टोळीतले आहेत,” अशी शंका यावेळी आव्हाड यांनी व्यक्त केली.

“यानंतर म्हाडाच्या जेवढ्या परीक्षा होतील, त्या सर्व म्हाडा घेईल. म्हाडा स्वतः पेपर सेट करेल, परीक्षेची सर्व जबाबदारी म्हाडा घेईल, अशी माहिती आव्हाड यांनी दिली. तसेच परीक्षा रद्द केल्याबद्दल जितेंद्र आव्हाड यांनी परीक्षेसाठी बसलेल्या विद्यार्थ्यांची माफी मागितली. तसेच परीक्षेसाठी घेण्यात आलेली फी म्हाडा विद्यार्थ्यांना परत करेल आणि पुढच्या वेळी जेव्हा पुन्हा परीक्षा घेतली जाईल, त्यावेळी म्हाडा कोणतीही फी या विद्यार्थ्यांकडून घेणार नाही,” अशी घोषणा आव्हाडांनी केली.