मुंबई : पहिली रोबोटिक शस्त्रक्रिया एप्रिल २०२५ मध्ये झाल्यानंतर अवघ्या सहा महिन्यांत लठ्ठपणावर यशस्वी शस्त्रक्रिया करून जे.जे. रुग्णालयाने शस्त्रक्रिया क्षेत्रात एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठला आहे. जे.जे. रुग्णालयामध्ये एका ३६ वर्षीय महिलेवर रोबोटिकच्या माध्यमातून यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. खासगी रुग्णालयांमध्ये क्वचितच होणारी ही किचकट शस्त्रक्रिया जे. जे. रुग्णालयात पूर्णपणे मोफत करण्यात आली. त्यामुळे जागतिक दर्जाची शस्त्रक्रिया तंत्रज्ञान हे आर्थिकदृष्ट्या कमकुवत वर्गातील रुग्णांसाठी यापुढे मोफत उपलब्ध होणार आहे.

पहिली रोबोटिक शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पडल्यानंतर अवघ्या ८३ दिवसांत १०० रोबोटिक शस्त्रक्रिया पूर्ण करून जे.जे. रुग्णालयाने रोबोटिक शस्त्रक्रिया करणाऱ्या भारतातील सार्वजनिक संस्थांमध्ये कमी कालावधीत १०१ शस्त्रक्रियांचा टप्पा गाठण्यात अव्वल स्थान पटकावले. त्यानंतर पुढील तीन महिन्यांत राज्याच्या ग्रामीण भागातून उपचारासाठी आलेल्या एका ३६ वर्षीय लठ्ठ महिलेवर यशस्वी रोबोटिक शस्त्रक्रिया केली.

या महिलेला मधुमेह, सांधेदुखी आणि लठ्ठपणाचा त्रास अनेक वर्षांपासून होता. त्यामुळे तिला दैनंदिन आयुष्य जगण्यातही अडचणी येत होत्या. मात्र आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने लठ्ठपणावर खासगी रुग्णालयामध्ये उपचार करणे परवडणारे नव्हते. भारतात अनेक शस्त्रक्रिया नवोपक्रमांचे प्रणेते असलेले सामान्य शस्त्रक्रिया विभागाचे प्राध्यापक व जे.जे. रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अजय भंडारवार यांनी महिलेवर काही दिवसांपूर्वी यशस्वी रोबोटिक शस्त्रक्रिया केली.

रोबोटिक तंत्रज्ञानाच्या मदतीने, शस्त्रक्रिया पथकाने अधिक अचूकता, कमीत कमी चीर, रक्तस्त्राव कमी आणि कमीत कमी वेळेत ती पूर्णपणे बरी झाली. डॉ. अजय भंडारवार यांच्या नेतृत्त्वाखाली डॉ. गिरीश बक्षी, डॉ. अमोल वाघ, डॉ. काशिफ अन्सारी आणि डॉ. सुप्रिया भोंडवे, भूलतज्ज्ञ विभाग प्रमख प्रा. डॉ. उषा बडोले, भरत शाह आणि डॉ. अश्विनी संडेज यांच्या तुकडीने ही शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण केली. यापुढे लठ्ठ व्यक्तींवर जे.जे. रुग्णालयात अशाच प्रकारे मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार असल्याचे भंडारवार यांनी सांगितले.

अन्य महत्त्वाच्या शस्त्रक्रिया पार पाडल्या

मूत्रविज्ञान विभागाने १० सप्टेंबर रोजी दोन प्रगत रोबोटिक शस्त्रक्रीया पार पाडल्या. रिचा (नाव बदलले आहे) (२० वर्षे) यांच्या डाव्या मूत्रपिंड आणि मूत्रवाहिनीच्या जंक्शनवरील अडथळा दूर करण्यासाठी रोबोटिक पायलोप्लास्टी केली. या शस्त्रक्रियेमुळे तिच्या मूत्रपिंडाचे कार्य टिकवून ठेवण्यास मदत झाली. त्याचप्रमाणे विश्वास राऊत (नाव बदलले आहे) (६७ वर्षे) उजव्या मूत्रपिंडामध्ये खडे असल्याने त्यांच्यावर रोबोटिक नेफ्रेक्टोमी म्हणजेच खराब झालेले मूत्रपिंड काढून टाकण्याची शस्त्रक्रिया यशस्वीरित्या करण्यात आली. त्यांची प्रकृती स्थिर आहे. डॉ. अमोल कांबळे, डॉ. माधव तिवारी, डॉ. शशांक शर्मा, डॉ. सिद्धांत श्रीवास्तव आणि डॉ. उमर खान हे शस्त्रक्रियेत सहभागी होते.

रोबोटिक तंत्रज्ञानामुळे जटिल शस्त्रक्रियांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला. सार्वजनिक आरोग्यसेवेतील या बदलाचे नेतृत्व करण्याचा जे.जे. रुग्णालयाला अभिमान आहे. वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या पाठिंब्यामुळे आणि सचिव धीरज कुमार यांच्या प्रयत्नांमुळे जे.जे. रुग्णालयामध्ये राबोटिक शस्त्रक्रिया शक्य झाली.– डॉ. अजय भंडारवार, अधिष्ठाता, जे. जे. रुग्णालय