व्याघ्रदिनानिमित्त चित्रफितीद्वारे जनजागृती

मुंबई : तब्बल १४ वर्षांनंतर मार्च २०२० रोजी भायखळा येथील ‘वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणिसंग्रहालय’ (राणीची बाग) येथे वाघाची डरकाळी ऐकू  आली. शक्ती आणि करिश्मा यांची जोडी राणीच्या बागेत दाखल झाल्यानंतर १ वर्षांहून अधिक काळ लोटला आहे. या काळातील वाघजोडीच्या हालचाली टिपणारी आणि वाघांचे महत्त्व सांगणारी चित्रफीत ‘द मुंबई झू’ या ऑनलाइन व्यासपीठावर गुरूवारी व्याघ्रदिनानिमित्त प्रदर्शित करण्यात आली.

राणीची बाग १४ वर्षे वाघांच्या सहवासापासून दुरावली होती. त्यानंतर औरंगाबादमध्ये जन्मलेली ‘बेंगॉल टायगर्स’ प्रजातीची ७ वर्षीय करिश्मा आणि ५ वर्षीय शक्ती यांची जोडी गेल्या वर्षी बागेत दाखल झाली. कोणताही नवीन प्राणी आणल्यानंतर त्याला विलगीकरणात ठेवले जाते. तसे शक्ती व करिश्मालाही ठेवण्यात आले. त्यानंतर हळूहळू ही जोडी राणीच्या बागेत रुळली. झाडावर खेळताना, आपले अन्न तोंडात घेऊन येरझाऱ्या घालताना, पाण्यात आंघोळ करतानाची या वाघांची दृश्ये टिपून त्याची एक चित्रफीत तयार करण्यात आली. वाघांविषयीचे कु तूहल जागवण्यासोबतच जनजागृती करणे हा या चित्रफितीचा उद्देश आहे.

वन्यजीवांची तस्करी, मानव-प्राणी संघर्ष, धोक्यात आलेला अधिवास यांचे दुष्परिणाम वाघांच्या संख्येवर होतात; मात्र अनेक वर्षांच्या प्रयत्नांनंतर वाघांची संख्या वाढताना दिसत आहे, असे या चित्रफितीत म्हटले आहे. पर्यावरणीय दृष्टिकोनातून महत्त्वाच्या असलेल्या या प्राण्याचे संरक्षण करण्यासाठी जबाबदार पर्यटक बना आणि वाघ संरक्षण प्रकल्पामध्ये स्वयंसेवक म्हणून सहभागी व्हा, असे आवाहनही करण्यात आले आहे.

समाजमाध्यमांद्वारे फलक लेखन स्पर्धा

व्याघ्रदिनानिमित्त फलक लेखन (पोस्टर मेकींग) स्पर्धेचे आयोजन राणीच्या बागेतर्फे   करण्यात आले आहे. ३१ जुलै संध्याकाळी ७ वाजेपर्यंत आपल्या फलकाचे छायाचित्र फे सबूक किं वा इन्स्टाग्रमावर प्रकाशित करून त्यात ‘द मुंबई झू’ला टॅग करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.