पंजाब आणि महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह बँक (पीएमसी) घोटाळ्याप्रकरणी बँकेचे निलंबित माजी व्यवस्थापकीय संचालक (एमडी) जॉय थॉमस यांना मुंबईतील कोर्टाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. तर दुसरे माजी संचालक सुरजीत सिंह अरोरा यांना २२ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. आरोरा यांना काल आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली होती.

पीएमसी बँकेचे निलंबित एमडी जॉय थॉमस हे ४,३३५ कोटी रुपयांच्या फसवणूकप्रकरणी सध्या तुरुंगात आहेत. चौकशीदरम्यान, थॉमस यांच्या वैयक्तिक आयुष्याबाबत रहस्यमय खुलासा झाला आहे. तो म्हणजे ते आपले नाव बदलून दुहेरी जीवन जगत होते. थॉमस यांनी दोन लग्न केली होती. पहिली पत्नी आणि मुलं असताना त्यांचे आपल्या पीएसोबत अफेअर होते, त्यानंतर पीएसोबत लग्न करण्यासाठी त्यांनी इम्लाम स्विकारला आणि आपले नाव जॉय थॉमस जुनैद केले. त्यांच्या या दुहेरी जीवनामागे देखील पीएमसी बँकेच्या फसवणुकीचे धागेदोरे असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. कारण, त्यांच्या दुसऱ्या पत्नीच्या नावे पुण्यामध्ये ९ फ्लॅट असल्याचे तपासात समोर आले आहे.

दरम्यान, पीएमसी बँक घोटाळ्याप्रकरणी यापूर्वी अटक केलेल्या माजी अध्यक्ष वरियम सिंह, एचडीआयएल कंपनीचे प्रवर्तक राकेश वाधवान आणि त्यांचे चिरंजीव सारंग यांना आर्थिक गुन्हे विभागाने बुधवारी कोर्टात हजर केल्यानंतर त्यांना २३ ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली. या सुनावणीदरम्यान सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) या तिघांना ताब्यात देण्याची मागणी करणारा अर्ज न्यायालयात सादर केला. ईडीनेही कर्ज घोटाळयाची दखल घेत स्वतंत्रपणे तपास सुरू केला आहे.