शहरातील सरकारी दूरध्वनी सेवा महानगर टेलिफोन निगम (एमटीएनएल)चे जुहू परिसरातील हजारो दूरध्वनी गेल्या पंधरा ते वीस दिवसांपासून बंद असलेली सेवा मनसेच्या दणक्यानंतर आता पूर्ववत झाली आहे.
खार दूरध्वनी केंद्राच्या अंतर्गत येणाऱ्या जुहू विभागातील सुमारे एक हजार ग्राहकांचे दूरध्वनी गेल्या पंधरा ते वीस दिवसांपासून बंद होते. तर दोन हजारहून अधिक ग्राहकांचे दूरध्वनीची सेवा अखंडीत मिळत नसल्याची तक्रार होती. अनेक ठिकाणी दूरध्वनीवरून आवाज समोर पोहचत नाही तर अनेकदा समोरील आवाज ऐकू येत नाही असे प्रकार घडत होते.  इंटरनेट सेवेतही अडचण येत असल्याची  तक्रार होती. जुहू विभागाअंतर्गत जुहू तारा रोड, ब्राह्मणवाडी, दौलतनगर, धीरज शॉनिंग सेंटर, बेस्ट वसाहत, शिक्षक वसाहत, स्मशान गल्ली, रिझवी पार्क, खिरानगर, जुहू, जुहू गार्डन, सांताक्रूझ पोलीस ठाणे परिसर, आरबीआय वसाहत, एलआयसी वसाहत, रहेजा महाविद्यालय, आर्य समाज या परिसरांतील सेवेवर परिणाम झाला होता. या संदर्भात ग्राहकांनी दूरध्वनी केंद्राशी संपर्क साधला असता त्यांना समाधानकारक उत्तरे मिळत नव्हती. अखेर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या विधी विभाग व जनहित कक्षाचे मुंबई चिटणीस अॅड. देवाशिष मर्क यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह केंद्र प्रमुखांची भेट घेऊन निवेदन देऊन ही सेवा तातडीने सुरळीत करावी अशी सूचना केली होती. तसेच जर आणखी काही दिवस सेवा सुरळीत झाली नाही तर आंदोलनाचा इशाराही त्यांनी दिला होता. या दणक्यानंतर दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले. दरम्यान, खार केंद्रातून जुहू केंद्राला जोडणाऱ्या वाहिनीत बिघाड झाला होता. ती आता दुरुस्त झाली असल्याचे जुहू दूरध्वनी केंद्राचे वरिष्ठ व्यवस्थापक ओमप्रकाश टी. राम यांनी स्पष्ट केले.