मुंबई : विहिरीत पडलेल्या तिघांना वाचवताना मृत्युमुखी पडलेल्या कल्याण-डोंबिवली अग्निशमन दलाच्या दोन जवानांच्या पत्नींना प्रत्येकी दहा लाख रुपयांच्या विम्याची रक्कम देण्याचे आदेश उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिले. हे जवान घटनेच्या वेळी मद्याच्या नशेत असल्याचा दावा करून त्यांच्या कुटुंबीयांना विमा संरक्षण नाकारण्याचा निर्णयही न्यायालयाने रद्द केला.

विमा संरक्षण नाकारणाऱ्या राज्य सरकारच्या निर्णयाला आव्हान दीपा वाघचौडे आणि अंजली शेलार यांनी दिले होते. याचिकेवर निर्णय देताना न्यायमूर्ती रेवती डेरे आणि न्यायमूर्ती माधव जामदार यांच्या खंडपीठाने  आदेश दिले.  सानुग्रह रक्कम नाकारण्यापूर्वी घटकांचा विचार न करताच  दावा फेटाळला होता. सरकारच्या या भूमिकेचा अन्य जवानांच्या कामावर परिणाम होईल, असे ताशेरे न्यायालयाने ओढले.

घटना काय?

याचिकाकर्त्यांचे पती प्रमोद वाघचौडे आणि अनंत शेलार हे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत अग्निशमन जवान म्हणून कार्यरत होते. नोव्हेंबर २०१८ मध्ये विहीर स्वच्छ करताना बेशुद्ध पडलेल्या तिघांना वाचवण्याच्या प्रयत्नात त्यांचा मृत्यू झाला होता.