ज्योतिर्भास्कर साळगांवकर यांची आजची ओळख ज्योतिषी, पंचागंकर्ते आणि धर्मशास्त्राचे गाढे अभ्यासक अशी असली तरी काही वर्षांपूर्वी त्यांची ओळख ‘शब्दकोडे रचनाकार’अशी होती. ‘लोकसत्ता’च्या संपादकीय विभागातही त्यांनी काही काळ काम केले होते. त्यानंतर ‘शब्दरंजन’या नावाने चालविलेल्या शब्दकोडय़ांवरील मासिकाने त्यांना प्रचंड प्रसिद्धी मिळवून दिली़ लौकिकार्थाने कमी शिक्षण झालेले साळगांवकर गाढय़ा व्यासंगाच्या बळावर विद्वत्जनांचे मुकुटमणी ठरल़े या ज्योतिर्भास्कराचा हा अल्पपरिचय..
सिंधुदुर्ग जिल्हातील मालवण येथे १ फेब्रुवारी १९२९ रोजी जन्मलेल्या जयंत साळगांवकर यांचे लौकिकार्थाने दहावीपर्यंतच शिक्षण झाले होते. परंतु अफाट वाचन, संस्कृतचा सखोल अभ्यास, गाढा व्यासंग आणि विविध क्षेत्रांतील नामवंतांचा सहवास यांतून त्यांनी परिश्रमपूर्वक अफाट बौद्धिक उंची गाठली, आणि या गुणांच्या बळावरच यश पायाशी लोळण घेते, या उदाहरणाचा आदर्शदेखील मराठी जनमानसात रुजविला. ज्योतिष, पंचांग आणि भारतीय संस्कृती व धर्मशास्त्र यांचे ते गाढे अभ्यासक होते. पंचांग आणि दिनदर्शिका यांचा कल्पक मेळ घालून त्यांनी ‘कालनिर्णय’ ही दिनदर्शिका १९७३ मध्ये सुरू करून पंचांगालादेखील वाचनीय केले, आणि घराघराच्या भिंतीवर पंचांग दिसू लागले. ‘कालनिर्णय’ हा जणू पंचागांचाच प्रतिशब्द वाटावा इतके हे पंचांग घराघरात रुळले. आपल्या कल्पक व्यावसायिक कौशल्याने त्यांनी कालनिर्णय हा एक ब्रँड म्हणून बाजारात आणला आणि तो इतका यशस्वी केला, की आज नऊ भाषांमधून प्रकाशित होणारी ही दिनदर्शिका देशाचा भौगोलिक सीमा ओलांडून सातासमुद्रापार पोहोचली आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर अफाट लोकप्रियता मिळालेल्या या दिनदर्शिकेच्या मराठी भाषेतील आवृत्तीचा खप ४८ लाखांहून अधिक आहे. वृत्तपत्रातून राशीभविष्य आणि शब्दकोडे लोकप्रिय करण्याचे श्रेय साळगांवकर यांनाच आहे. भविष्यासाठी प्रसिद्ध असलेल्या ‘धनुर्धारी’या दिवाळी अंकातील राशीभविष्यही काही वर्षे त्यांनी लिहिले होते.
नियताकालिकांतील भविष्यलेखनाला ललित शैलीची जोड दिल्यामुळे हा काहीसा चौकटीबाहेरचा, रुक्ष वाटणारा विषयही वाचकांनी आवडीने स्वीकारला, आणि भविष्यवाचनाची गोडी मराठी वाचकांमध्ये रुळली.
साळगांवकर यांची आजची ओळख ज्योतिषी, पंचागंकर्ते आणि धर्मशास्त्राचे गाढे अभ्यासक अशी असली तरी काही वर्षांपूर्वी त्यांची ओळख ‘शब्दकोडे रचनाकार’अशी होती.
‘लोकसत्ता’च्या संपादकीय विभागातही त्यांनी काही काळ काम केले होते. त्यानंतर ‘शब्दरंजन’या नावाने शब्दकोडय़ांवरील मासिक त्यांनी चालविले. या मासिकाने त्यांना खूप लोकप्रियता मिळाली. काही वर्षांपूर्वी त्यांनी ‘कालनिर्णय वर्तमान’ हे मराठी दैनिकही सुरू केले. भविष्याचा अभ्यास असलेल्या साळगांवकरांचे हे ‘वर्तमान’ मात्र फारसे टिकले नाही. एकदोन महिन्यातच ते बंद पडले. ‘लोकसत्ता’ दैनिकातील साळगांवकर यांच्या ‘देवाचिये द्वारी’ या सदरास प्रचंड लोकप्रियता लाभली होती. सलग चार वर्षांहून अधिक काळ चाललेल्या या सदरातील लेखांचे संकलन असलेली पाच पुस्तके प्रकाशित झाली आहेत.
साहित्य, राजकारण, समाजकारण, व्यापार, आदी अनेक क्षेत्रांत सहजपणे वावरणारे साळगांवकरांनी समाजाच्या वेगवेगळ्या थरांतील असंख्यांशी कौटुंबिक ऋणानुबंधांचे नाते जपले. त्यामुळे सामान्य माणसालादेखील ते नेहमी आपलेसे वाटत राहिले. ज्योतिष आणि धर्मशास्त्रांवरही साळगांवकर यांनी विपुल लेखन केले. या विषयांवरील त्यांचे दोन हजारांहून अधिक लेख वेगवेगळ्या वृत्तपत्रांतून प्रसिद्ध झाले आहेत.
साळगांवकर हे निस्सीम गणेशभक्त होते. गणपतीविषयक विविध श्रद्धा, अंधश्रद्धा, गणपतीचे महत्व याविषयी ही त्यांनी विविध वृत्तपत्रे आणि मासिकातून लेखन केले होते. सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात काम करणाऱ्या अनेक संस्थामध्ये ते कार्यरत होतेच पण अनेक संस्थांचेही ते प्रमुख आधारस्तंभ होते. वेगवेगळ्या संस्था आणि संघटनांकडून त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले होते.
साळगांवकर यांना मिळालेले विविध पुरस्कार
* कोकण मराठी साहित्य परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार.
* मुंबई मराठी पत्रकार संघाचा उत्कृष्ट सदर लेखनाचा भ्रमंती पुरस्कार.
* महाराष्ट्र ज्योतिष विद्यापीठाने दिलेली ‘विद्यावाचस्पती’ही पदवी.
* मुंबईच्या ज्योतिर्विद्यालयातर्फे दिलेली ज्योतिषालंकार ही पदवी.
* संकेश्वर पीठाच्या शंकराचार्यानी दिलेली ज्योतिर्भास्कर ही पदवी.
* महाराष्ट कला निकेतनतर्फे महाराष्ट्र रत्न हा पुरस्कार.
* श्री मसर्थ सेवा मंडळ (सज्जनगड) यांच्यातर्फे समर्थ संत सेवा पुरस्कार.
* राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या जनकल्याण समिती (महाराष्ट्र)यांच्यातर्फे धर्मसंस्कृती क्षेत्रातील कार्यासाठी दिलेला श्री गुरुजी पुरस्कार.
देवबाग येथील गणपती मंदिर
सिंधुदुर्ग जिल्ह्यात मालवण जवळ साळगांवकर यांनी बांधलेले गणपती मंदिर हे अनेक भक्तांचे श्रद्धास्थान ठरले असून या मंदिरातील गणपतीची मूर्ती सोन्याची आहे.
विविध पुस्तके आणि लेखन
* ‘लोकसत्ता’मध्ये १९९५ ते १९९९ या काळात त्यांनी ‘देवाचिये द्वारी’ हे सदर लिहिले.
* या सदरात प्रसिद्ध झालेल्या लेखांचे संकलन पुस्तक रुपाने प्रकाशित यात ‘देवाचिये द्वारी’, ‘सुंदर ते ध्यान’, ‘अमृताची खाणी’, ‘आनंदाचा कंद’, ‘ज्ञानाचा उद्धार’ या पुस्तकांचा समावेश
* समर्थ रामदास स्वामी यांच्या जीवनावरील ‘सुंदरमठ’ ही कादंबरी.
* ‘धर्मशास्त्रीय निर्णय’ या ग्रंथाचे संपादन आणि लेखन.
* देवा तूचि गणेशु, दुर्वाक्षरांची जुडी, गणाधीश जो ईश, रस्त्यावरचे दिवे, भाव तोचि भगवंत
* विविध वृत्तपत्रे, मासिके, साप्ताहिके यामधून सुमारे दोन हजारांहून अधिक लेख
सामाजिक – सांस्कृतिक संस्थामध्ये भूषविलेली विविध पदे
* श्री सिद्धिविनायक मंदिराचे माजी विश्वस्त.
* आयुर्विद्यावर्धिनी या संस्थेचे माजी अध्यक्ष.
* मुंबई मराठी साहित्य संघाचे अध्यक्ष.
* ‘श्री गणेश महानिधी’ या विश्वस्त निधीचे संस्थापक अध्यक्ष.
* महाराष्ट्र सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाचे अध्यक्ष.
* दादर-माटुंगा कल्चरल सेंटरचे विश्वस्त.
* महाराष्ट्र व्यापारी मित्र मंडळाचे अध्यक्ष.
* अखिल भारतीय ज्योतिष संमेलनाचे अध्यक्ष.
* ७४ व्या अखिल भारतीय मराठी नाटय़ संमेलनाचे स्वागताध्यक्ष.
* आठव्या मराठी प्रकाशक संमेलनाचे अध्यक्ष.
* बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीचे प्रमुख सल्लागार.
* मुंबई मराठी पत्रकार संघाचे सन्माननीय सदस्य.
रुद्राक्ष माळा वाटपाचा संकल्प
धार्मिक आणि आध्यात्मिक दृष्टय़ा रुद्राक्षाचे महत्व खूप मोठे आहे. सर्वसामान्य श्रद्धाळू लोकांमध्ये धार्मिक, आध्यात्मिक आणि भक्ती मार्गाची आवड उत्पन्न व्हावी तसेच जपाच्या माध्यमातून त्यांना मानसिक शांती मिळावी, यासाठी साळगांवकर यांनी काही हजार रुद्राक्ष माळा लोकांना वाटण्याचा संकल्प केला होता. त्याप्रमाणे त्यांनी अनेक जणांना या माळांचे वाटप केले होते.