राज्यात मोठी राजकीय सुनामी घडवून आणणाऱ्या आदर्श गृहनिर्माण सोसायटीचे प्रवर्तक आणि आदर्श घोटाळ्यातील एक प्रमुख आरोपी, माजी आमदार कन्हैय्यालाल गिडवाणी यांचे मंगळवारी सकाळी ब्रीच कँडी रुग्णालयात हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले. ते ६४ वर्षांचे होते. कन्हैयालाल गिडवाणी यांचा राजकीय प्रवास सुरस व चमत्कारिक होता. सांगलीतील साखरेचा किरकोळ व्यापारी असलेल्या गिडवणी यांनी आधी काँग्रेस व नंतर शिवसेनेच्या आधाराने आपली राजकीय वाटचाल सुरु केली. राज्यात शिवसेना-भाजप युती सरकारच्या काळात ते शिवसेनेत गेले व त्यांनी विधान परिषदेची आमदारकी मिळविली. सत्तापालटानंतर त्यांनी पुन्हा काँग्रेसशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केला. शिवसेनेतून बाहेर पडून काँग्रेसमध्ये आलेल्या नारायण राणे यांचे ते खास समर्थक मानले जात होते. काँग्रेसमध्ये आल्यानंतर त्यांनी संघटनेत काम करायला सुरुवात केली. २००९ च्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्यावेळी त्यांना प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते करण्यात आले होते.