२० महिन्यांत प्रकल्पाचे काम पूर्ण होणे अपेक्षित

नमिता धुरी
मुंबई : स्थलांतरित पक्षी आणि इतर अनेक प्रकारच्या प्राण्यांचे आश्रयस्थान असणाऱ्या कांदळवनांबाबत जनजागृती करण्याच्या हेतूने गोराई जेट्टी येथे कांदळवन कक्षातर्फे  कांदळवन उद्यान उभारण्यात येत आहे. यासाठीचे कार्यादेश देण्यात आले असून पुढील २० महिन्यांत हे काम पूर्ण होणे अपेक्षित आहे. दहिसर येथेही अशाप्रकारचे उद्यान प्रस्तावित आहे.

पाणी शोषून घेण्याची भरपूर क्षमता कांदळवनांमध्ये असल्याने पूरस्थिती नियंत्रणात राहण्याच्या दृष्टीने कांदळवने महत्त्वाची असतात. शिवाय मोठय़ा माशांपासून संरक्षण करण्यासाठी छोटे मासे आपली अंडी कांदळवनांमध्ये घालतात. खेकडय़ांसारखे जलचर कांदळवनांमध्ये राहात असल्याने मच्छीमारांची उपजीविका या झाडांवर अवलंबून असते. अनेकदा विविध विकासकामांसाठी कांदळवने नष्ट केल्याने पर्यावरणाची हानी होते. त्यामुळे कांदळवनांच्या संरक्षणाच्या दृष्टीने जनजागृती करण्यासाठी गोराई येथे उद्यान उभारले जात आहे.

गोराई खाडीच्या भोवताली असलेल्या कांदळवनामध्ये पर्यटकांना फेरफटका मारता येणार आहे. एखाद्या महत्त्वाच्या ठिकाणी थांबून त्या जागेचे निरीक्षणही करता येईल. या वेळी कांदळवनातील जैवविविधता प्रत्यक्ष अनुभवण्याची संधी मिळेल. याशिवाय ‘नेचर इंटरप्रिटेशन सेंटर’ उभारले जाणार आहे. येथे दृक्श्राव्य माध्यमातून कांदळवनांबाबत माहिती दिली जाईल. लहान मुलांसाठी शैक्षणिक माहिती सत्रेही आयोजित केली जातील.

कांदळवनातील फेरफटका मारून झाल्यानंतर ‘नेचर इंटरप्रिटेशन सेंटर’कडे पर्यटकांना नेण्यासाठी बॅटरीवर आधारित वाहने उपलब्ध असणार आहेत. त्यानंतर कांदळवनांचे एकसंध असे विहंगम दृश्य पाहण्यासाठी टेहळणी इमारत (वॉच टॉवर) उभारली जाणार आहे. उद्यानासाठी आवश्यक असणाऱ्या बांधकामासाठी मातीच्या तपासणीचे काम सुरू झाले असून २० महिन्यांत हा प्रकल्प पूर्ण होणे अपेक्षित आहे. या कांदळवन उद्यानासाठी २५ कोटी रुपये निधी खर्च क रण्यात येणार आहे.

कांदळवनांच्या संरक्षणासाठी वनविभाग कार्य करत आहे हे सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न या उद्यानाच्या माध्यमातून केला जाणार आहे. तसेच यामुळे पर्यटकांना कांदळवनांविषयी प्राथमिक ज्ञान प्राप्त होईल. येथे पर्यटन सुरू झाल्यानंतर भोवतालच्या प्रदेशात रोजगारही निर्माण होऊ शकतो.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

– आदर्श रेड्डी, विभागीय वन अधिकारी, कांदळवन कक्ष