दशकभरात अनेक पक्षी परागंदा; दुर्मीळ प्रजाती नष्ट होण्याची भीती

पक्षीप्रेमी व पर्यटकांचे आकर्षण असलेले कर्नाळा पक्षी अभयारण्य सध्या शहरी घारींच्या दहशतीखाली आहे. घारींच्या उपद्रवामुळे व हल्ल्यांमुळे गेल्या दहा वर्षांत मोठय़ा प्रमाणावर पक्षी अभयारण्यातून परागंदा झाल्याचे सर्वेक्षणात दिसून आले आहे. घारींचा बंदोबस्त केला नाही, तर पक्ष्यांच्या अनेक दुर्मीळ प्रजाती नाहीशा होण्याची भीती व्यक्त होत आहे.

मुंबई-गोवा महामार्गालगत ४४६ किमी परिसरात कर्नाळा पक्षी अभयारण्य आहे. साधारण दशकभरापूर्वी येथे विविध पक्ष्यांच्या तब्बल १४७ प्रजातींचा वावर असायचा. त्यामुळे पक्षीनिरीक्षण व अभ्यासासाठी हे अभयारण्य एक महत्त्वाचे ठिकाण मानले जाते. परंतु अलीकडे पक्ष्यांची संख्या कमी होताना, तसेच काही प्रजातीही नष्ट झाल्याचे लक्षात आल्याने ठाणे वन कार्यालयाने अभयारण्याची पाहणी व अभ्यास करण्याची जबाबदारी मायव्हेट या संस्थकडे सोपविली होती.

ठाणे वन्यजीव कार्यालयाच्या सूचनेनुसार मायव्हेट संस्थेने जानेवारीत कर्नाळा अभयारण्याला भेट देऊन तेथील झाडे, घरटी, पक्षी यांची पाहणी केली. त्यांच्या पाहणीत घारींच्या उपद्रवामुळे अभयारण्यातील पक्षी भयभीत झाले असून, शेकडो पक्षी तेथून स्थलांतरित झाल्याचे आढळून आल्याची माहिती संस्थेचे सचिव डॉ. युवराज कागिनकर यांनी दिली. वाढते प्रदूषण व पाण्याची टंचाई ही कारणेही पक्ष्यांच्या स्थलांतरास कारणीभूत आहेत. परंतु मोठय़ा प्रमाणावर घारी अभयारण्यात येतात व तेथील पक्ष्यांच्या घरटय़ांवर, अंडय़ांवर हल्ले करतात, तसेच लहान पिलांनाही खातात असे आढळून आले.  घारींच्या आवाजानेही पक्षी घाबरतात व अन्यत्र उडून जातात. परिणामी गेल्या दहा वर्षांत अभयारण्यातील पक्ष्यांची संख्या मोठय़ा प्रमाणावर कमी झाल्याचे आढळून आल्याचे डॉ. कागिनकर यांचे म्हणणे आहे.

कर्नाळा अभयारण्यातून पक्ष्यांनी परागंदा होऊ नये यासाठी घारींचा बंदोबस्त करणे, वृक्षारोपण करणे, नैसर्गिक घरटी तयार करून तिथे पक्ष्यांना खाद्य उपलब्ध करून देणे, सध्या तिथे अस्तित्वात असलेल्या पक्ष्यांना संरक्षण देणे अशा विविध शिफारसी वन विभागाला करण्यात आल्या आहेत.

– डॉ. युवराज कागिनकर, मायव्हेट संस्थेचे सचिव

जखमी झालेल्या घारी अभयारण्यात सोडल्या जात होत्या, ते चुकीचे होते. या प्रकारांना आता बंदी घालण्यात आली आहे. अभयारण्याच्या परिसरातील घारींचे वास्तव्य मात्र नैसर्गिक आहे. त्यावर लक्ष ठेवण्यास वन कर्मचाऱ्यांना सांगण्यात आले आहे.

– एम. एम. कुलकर्णी, वनसंरक्षक, ठाणे वन कार्यालय

 

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.