विकासाची आश्वासने आणि फुगविलेल्या आकडय़ांचा कल्याणडों बिवली पालिकेचा सन २०१३-१४ चा तब्बल १ हजार ४१६ कोटी १९ लाख रूपयांचा शिलकी अर्थसंकल्प पालिका प्रशासनाने शुक्रवारी स्थायी समितीला सादर केला. या अर्थसंकल्पाच्या अर्थसंकल्पात१० लाख ५१ हजार रूपये शिल्लक दाखविण्यात आले आहेत.
याबरोबरीनेच शिक्षण मंडळाचा ४८ कोटी ६३ लाखांचा तर परिवहन समितीचा ८८ कोटी ३५ लाख रूपयांचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला. शहर विकासाचा देखावा उभा करून प्रशासनाने अर्थसंकल्प आर्थिकदृष्टय़ा अधिक देखणा करण्याचा प्रयत्न केला आहे.
‘बीओटीचे गेल्या पाच ते सहा वर्षांपासून रखडलेले प्रकल्प आणि त्यापासून पालिकेला होणाऱ्या आर्थिक लाभांचा कोठेही उल्लेख अर्थसंकल्पात खुबीने टाळण्यात आला आहे. या प्रकल्पांमध्ये काही लोकप्रतिनिधी, अधिकारी आणि ठेकेदार यांचे हितसंबंध गुंतले असल्याने बीओटी प्रकल्प ठेकेदारांची दुभती गाय बनली असल्याचे सांगण्यात येते. रस्त्यांच्या सिमेंटीकरणासाठी २१८ कोटी, शहर वाहतूक आराखडय़ासाठी- १ कोटी, उड्डाण पूल भुयारी मार्ग २१ कोटी, वाहतूक सिग्नल ६ कोटी, स्मारकांसाठी ५ कोटी, सिटी पार्क ९ कोटी तर नगरसेवक निधीसाठी  १० लाख रूपयांची तरतूद करण्यात आली आहे.