छत्रपती शिवाजी महाराजांविषयी व्हॉट्स अॅपवर ग्रुपवर वादग्रस्त पोस्ट टाकल्याप्रकरणी रायगड जिल्ह्यातील खालापूरमधील एका प्राध्यापकाला पोलिसांनी अटक केली आहे. सुनील वाघमारे (३८) असे या प्राध्यापकाचे नाव असून न्यायालयाने वाघमारेंना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती तिथीप्रमाणे १५ मार्चरोजी साजरी करण्यात आली. तर सरकार दरबारी १९ फेब्रुवारीरोजी शिवजयंती साजरी केली जाते. शिवाजी महाराज यांची जयंती दोनदा साजरी करण्यावर प्रा. वाघमारे यांनी टीका केली होती. प्रा. वाघमारे खालापूरमधील केएमसी महाविद्यालयात वाणिज्य शाखेत शिकवतात. गेल्या बुधवारी तिथीनुसार जयंती साजरी केली जात असताना प्रा. वाघमारे महाविद्यालयातील व्हॉट्स अॅपवर ग्रुपवर एक पोस्ट टाकली होती. यामध्ये वाघमारे यांनी दोनदा जयंती साजरी करण्यावर टीका केली होती. पोस्टमध्ये वाघमारे यांनी शिवाजी महाराजांविषयी अपशब्द वापरले होते असा आरोप केला जात आहे.

वाघमारे यांनी टाकलेली पोस्ट बघून ग्रुपमधील अन्य सदस्यांमध्ये नाराजी पसरली. ग्रुप अॅडमिननेही रात्रीच ग्रुप डिलीटही केला. मात्र त्यानंतरही वाद शमला नाही. दोन दिवसांनी महाविद्यालयातील विद्यार्थी आणि प्राध्यापकांनी वाघमारे यांना घेरले. वाघमारेंवर पोलीस कारवाई झाली पाहिजे अशी मागणी त्यांनी लावून धरली. शेवटी खोपोली पोलीस ठाण्यात वाघमारेंविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. धार्मिक भावना दुखावून तेढ निर्माण केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ‘शिवाजी महाराजांविषयी वाघमारे यांनी वापरलेले अपशब्द हिंसेला चालना देणारे असल्याने त्यांना अटक करण्यात आली. वाघमारे आणि त्यांच्या विरोधात तक्रार करणाऱ्या फिर्यादींचा मोबाईल फोनही आम्ही जप्त केला आहे अशी माहिती पोलीस निरीक्षक स्वाती शिंदे यांनी दिली. वाघमारे यांना न्यायालयासमोर हजर करण्यात आले असता त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.