माझ्यावर हल्ला करण्यासाठी छोट्या-मोठ्या दलालांना काय पाठवता, असा सवाल करत भाजप खासदार किरीट सोमय्या यांनी शिवसेनेला प्रतिआव्हान दिले आहे. मंगळवारी दसऱ्यानिमित्त महापालिकेतील भ्रष्टाचाराचा रावण दहन करण्यासाठी निघालेल्या किरीट सोमय्या यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता. यावेळी शिवसैनिकांनी रावणाच्या पुतळ्याची नासधूस करत भाजपच्या कार्यकर्त्यांची धुलाई केली होती. या मारहाणीत भाजप आणि स्वयंसेवी संस्थांच्या काही महिला कार्यकर्त्या जखमी झाल्या होत्या. त्यानंतर आक्रमक झालेले किरीट सोमय्या काल रात्रभर नवघर पोलीस ठाण्यात ठाण मांडून बसले होते. माझ्यावर हल्ला करणाऱ्या प्रत्येक दलालाला तुरूंगात टाकल्याशिवाय मी शांत बसणार नाही. या दलालांना माझ्यावर हल्ला करण्यासाठी माफियांकडून हफ्ता मिळाला असेल. अशा छोट्या-मोठ्या दलालांना पाठवून काय हल्ला करता? या हल्ल्यामुळे माझी पालिकेतील माफियांविरोधातील लढाई थांबणार नाही, असे किरीट सोमय्या यांनी सांगितले. दरम्यान, पोलिसांकडून आतापर्यंत शिवसेनेच्या पाच कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आले असून आणखी पाच कार्यकर्त्यांचा पोलीस शोध घेत आहेत. दरम्यान, शिवसेना नेते दत्ता साळवी यांनी हल्ला शिवसैनिकांनीच केल्याची जबाबदारी स्विकारली असून थोड्याचवेळात ते नवघर पोलीस ठाण्यात दाखल होणार आहेत.
मुलुंडमध्ये शिवेसना – भाजप कार्यकर्त्यांमध्ये राडा, महापालिकेतील भ्रष्टाचाराच्या रावणदहनाचा होता कार्यक्रम
काही दिवसांपूर्वीच किरीट सोमय्या यांनी  मुंबई महापालिकेतील एका परिवाराचे ‘माफिया राज’ संपवून टाकू, अशा शब्दांत शिवसेनेवर हल्ला चढवला होता. तसेच भाजप घटकपक्षांना सोबत घेऊन मुंबई महानगरपालिकेच्या २२७ जागा स्वबळावर लढणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले होते. त्यानंतर शिवसेना आणि भाजपमधील तणाव आणखी वाढला होता. उद्धव ठाकरे यांनीदेखील किरीट सोमय्या यांना उत्तर देण्यास माझे शिवसैनिक समर्थ असल्याचे म्हटले होते.
हिंमत असेल तर युती तोडा! 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kirit somaiya challenge shivsena
First published on: 12-10-2016 at 09:49 IST