भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांनी उद्धव ठाकरे गटातील नेत्या किशोरी पेडणेकर यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. पेडणेकर यांनी वरळी येथील गोमाता जनता एसआरएमधील ६ गाळे (सदनिका) हस्तगत केल्याचं सोमय्या म्हणाले आहेत. दरम्यान, सोमय्या यांच्या या आरोपानंतर पेडणेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. दवाबतंत्राचा वापर केला जात आहे. तुमच्याकडे केंद्रात सत्ता आहे. राज्यात सत्ता आहे. सत्ता असली म्हणून काहीही करायचं का? असा सवाल पेडणेकर यांनी केलेला आहे. तर पेडणेकर यांच्या याच आरोपानंतर आता किरीट सोमय्या यांनीदेखील जशास तसे उत्तर दिले आहे. पेडणेकर यांनी गरीब झोपडपट्टीवासीयांचे गाळे ढापले आहेत. त्याचा हिशोब द्यावा लागेल. दबावतंत्र तर उद्धव ठाकरे वापरत होते. चौकशी सुरू झाली आहे, त्यामुळे पेडणेकर यांना भाऊबीज आठवत आहे, असा टोला सोमय्या यांनी लगावला आहे. ते मुंबईत माध्यम प्रतिनिधींशी बोलत होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> किरीट सोमय्यांच्या आरोपानंतर किशोरी पेडणेकरांचे थेट आव्हान, म्हणाल्या “एक जरी गाळाधारक…”

किशोरी पेडणेकर यांनी २०१७ साली निवडणुकीमध्ये आपल्या शपथपत्रात एसआरएचा पत्ता दिला आहे. इमारत क्रमाक २, वरळी गोमाता जनता एसआरएमध्ये राहत असल्याचे त्यांनी आपल्या शपथपत्रात लिहिलेले आहे. पेडणेकर यांनी अर्धा डझन गाळे हस्तगत केले आहेत. त्याचा हिशोब घेण्यास सुरुवात झाली आहे. त्यांनी गरीब झोपडपट्टीवासीयांचे गाळे ढापले आहेत. आम्ही तुम्हाला गाळे देऊ, असे म्हणत लोकांकडून पैसे वसूल करण्यात आले. यासंदर्भातच दादर पोलीस ठाण्याकडून चौकशी सुरू आहे. मी किशोरी पेडणेकर यांचे नाव दिलेले नाही. तर जे लोक फसलेले आहेत, त्यांनीच पेडणेकर यांचे नाव घेतले आहे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना न्यू मरीन लाईन पोलीस ठाण्यानेही या प्रकरणाची चौकशी सुरु केली आहे, अशी माहिती सोमय्या यांनी दिली.

हेही वाचा >>> किरीट सोमय्यांच्या गंभीर आरोपानंतर आता किशोरी पेडणेकर आक्रमक, म्हणाल्या “जेरीस आणण्याचा डाव असेल तर…”

पाहा व्हिडीओ –

करोना साथीला पेडणेकर यांनी कमाईचे साधन बनवण्याचा प्रयत्न केला. मुंबईकरांना लाज वाटत आहे. करोना साथीला हाताळण्यासाठी पेडणेकरांनी त्यांच्याच कंपनीला कंत्राट दिलेले आहे. याबाबतही पेडणेकरांनी स्पष्टीकरण द्यावे. आम्ही दबावतंत्राचा वापर केलेला नाही. उद्धव ठाकरे यांनीच दबावतंत्राचा वापर केला होता. त्यांनी सगळी चौकशी दाबून ठेवली होती. आता चौकशीला सुरुवात झालेली आहे. त्यामुळे पेडणेकर यांना भाऊबीज आठवत आहे, असा टोला सोमय्या यांनी लगावला.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kirit somaiya criticizes back kishori pednekar said uddhav thackeray tried to cover up sra scam prd
First published on: 29-10-2022 at 13:30 IST