भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांच्यावर शनिवारी खास पोलीस स्थानकाबाहेर झालेल्या हल्ल्याच्या प्रकरणी खोटी एफआयआर दाखल केल्याप्रकरणी आज सोमय्या खार पोलीस स्थानकात तक्रार नोंदवण्यासाठी गेले आहेत. मात्र खार पोलीस स्थानकामध्ये जाण्याआधी सोमय्यांनी या प्रकरणावरुन ठाकरे सरकावर कठोर शब्दांमध्ये टीका केली. शिवसेनेचा उल्लेख ‘माफिया सेना’ तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा उल्लेख ‘माफिया सेनेचे सरदार’ असा करत सोमय्यांनी ठाकरे सरकावर निशाणा साधत खोटी एफआयआर दाखल करणाऱ्या अधिकाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी केलीय. इतकच नाही तर या प्रकरणी बोलताना सोमय्यांनी आपल्या हत्येचा कट रचण्यात आलेला मात्र राज्यातील साडेबारा कोटी जनतेचं प्रेम आपल्या पाठीशी असल्याचं म्हटलंय.

नक्की वाचा >> राऊतांच्या ‘टोमॅटो सॉस लावून फिरणारा माथेफिरु’ टीकेवर सोमय्यांचं उत्तर; म्हणाले, “उद्धव ठाकरेंच्या माफिया…”

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

एवढी लुच्चागिरी फक्त ठाकरे सरकारच करु शकते
पत्रकारांशी संवाद साधताना सोमय्या यांनी, “कुठला बोगस किरीट सोमय्या उभा केला, कमांडोची मारहाण झाली हे लिहिलच नाहीय. किरीट सोमय्याला जीवे मारण्याचा प्रयत्न झाला, पोलीस स्थानकाच्या आवारामध्ये ७०-८० शिवसैनिक गुंडगिरी करत होते हे लिहिलं नाहीय. काय लिहिलंय उद्धव ठाकरेंच्या पोलीसने तीन किलोमीटर लांब शिवसैनिक होते. अरे टीव्ही चॅनेल लाइव्ह दाखवत होते. एवढी लुच्चागिरी फक्त ठाकरे सरकारच करु शकते,” असा टोला लगावलाय.

सीसीटीव्ही फुटेज हवे आहेत…
तसेच पुढे बोलताना सोमय्यांनी, “मी काल दिल्लीला जाऊन सांगितलं तर ते म्हणाले ब्रिंग इट ऑन रेकॉर्ड. म्हणून खार पोलीस स्थानकात जाऊन अधिकृत तक्रार देणार. ज्या अधिकाऱ्याने माझ्या नावाने खोटी स्वाक्षरी केलीय, खोटी एफआयआर केलीय त्याच्यावर तातडीने कारवाई करा. खरी घटना, सीसीटीव्ही फुटेज सीआयएसएफला हवे आहेत,” असंही सांगितलंय.

तर आम्ही न्यायालयात जाणार
“आम्ही राज्यपालांना भेटणार, केंद्रीय गृहसचिवांना अपडेट, गरज पडली, ठाकरे सरकारने कारवाई नाही केली. किरीट सोमय्यांची हत्या करण्याचा गुन्हा दाखल झाला पाहिजे. कमांडो, सरकारी कर्माचाऱ्याला माजी महापौरांनी मारहाण केलीय. गुन्हा दाखल झाला पाहिजे. पोलीस स्थानकाच्या आवारात गुंडगिरी गुन्हा दाखल झाला पाहिजे. हे सर्व सेक्शन उद्धव ठाकरे सरकारने नाही लावले तर आम्ही न्यायालयात जाणार,” असं सोमय्या म्हणाले.

बारीक दगड लागल्याचं म्हटलंय.
माजी महापौरांसहीत शिवसैनिकांना अटक करुन जामीन मिळाला असल्याच्या मुद्द्यावरुन प्रश्न विचारला असताना सोमय्यांनी, “अरे बनवाबनी आहे. त्यांनी सुरक्षारक्षकांना मारलं. किरीट सोमय्यांचा जीव घेण्याचा प्रयत्न केला हे सर्व सेक्शन लावावे लागणार,” असं उत्तर दिलं. “उद्धव ठाकरेंनी स्वत: एक फर्जी एफआयआर केली आणि त्यात लिहिलं किरीट सोमय्या असं म्हणतात की फक्त एकच बारीक दगड लागला. ही एफआयआर आहे. तिथं कोणीच नव्हतं असं लिहिलंय. एफआयआरची भाषा वाचल्यावर लक्षात येतं की मधला भाग गायब आहे. फर्जी एफआयआर हे माफिया सेनेचे सरदार उद्धव ठाकरेच करु शकतात,” असं सोमय्या म्हणालेत.

हत्येचा प्रयत्न झाल्याचा दावा…
राऊत यांनी केलेल्या या टीकेचा संदर्भ देत सोमय्यांना प्रश्न विचारण्यात आला. राऊत यांनी तुम्हाला टोमॅटो सॉस लावून फिरवाणार माथेफिरु असं म्हटलं असून तुमच्याकडे दुर्लक्ष केलं पाहिजे असंही म्हटलंय, असं पत्रकारांनी सोमय्यांना सांगितलं. त्यावर प्रतिक्रिया देताना सोमय्यांनी उद्धव ठाकरेंच्या माफीया सेनेनं आपली हत्या करण्याचा प्रयत्न केल्याचा गंभीर आरोप केलाय. “उद्धव ठाकरेंच्या माफिया सेनेनं खार पोलीस स्थानकाच्या हद्दीत किरीट सोमय्यांची हत्या करण्याचा प्रयत्न केला. सगळं लाइव्ह दाखवण्यात आलंय,” असं सोमय्या म्हणाले.

राज्यातील जनतेचं प्रेम पाठीशी आहे
“तिसऱ्यांदा हत्या करण्याचा प्रयत्न कशासाठी केला गेला. कारण माफिया सेनेचे जितके काही छोटे-मोठे सरदार आहेत सगळ्यांचे घोटाळे बाहेर आले. अनेकांच्या प्रॉपर्टी जप्त झाल्या. अनेकांना अटक झाली, अनेक जेलमध्ये आहेत, अनेक रुग्णालयात आहेत. अमुक जामीनावर आहे. म्हणून ठाकरे सरकार कापायला लागलीय. म्हणून मनसुख हिरेननंतर किरीट सोमय्यांची हत्या करण्याचा प्रयत्न झाला.पण किरीट सोमय्याच्या पाठीशी महाराष्ट्राच्या साडेबारा कोटी जनतेचं प्रेम आहे. उसका बाल भी बाँका नहीं होगा,” असं सोमय्या म्हणाले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kirit somaiya slams shivsena says they tried to kill me scsg
First published on: 26-04-2022 at 12:35 IST