कोकण रेल्वे महामंडळाचे उत्तर * गाडीच्या देखभाल दुरुस्तीसाठी साडेचार तासांचा अवधीच योग्य
सुरक्षा आयुक्तांच्या ताशेऱ्यांना प्रत्युत्तर
तब्बल १९ जणांचे प्राण घेणाऱ्या दिवा-सावंतवाडी पॅसेंजर अपघातप्रकरणी कोकण रेल्वेचा काही एक दोष नसून आम्ही आमच्या गाडय़ांची देखभाल-दुरुस्ती साडेचार तासांत योग्य पद्धतीने करू शकतो. त्या प्रकारची यंत्रणा कोकण रेल्वेने गेल्या काही वर्षांत विकसित केली असून भारतीय रेल्वेनेही त्यातून शिकण्यासारखे आहे, असे ठाम उत्तर कोकण रेल्वे महामंडळाने दिले आहे. कोकण रेल्वेने गाडय़ांच्या देखभाल दुरुस्तीसाठी सहा तासांऐवजी केवळ साडेतीन-चार तासच दिल्याचा ठपका ठेवत रेल्वे सुरक्षा आयुक्तांनी आपल्या अहवालात या अपघातासाठी कोकण रेल्वेलाही दोषी ठरवले होते.
दिवा-सावंतवाडी पॅसेंजर अपघाताच्या चौकशी अहवालात रेल्वे सुरक्षा आयुक्त चेतन बक्षी यांनी मध्य आणि दक्षिण रेल्वे यांच्याबरोबरच कोकण रेल्वेला दोष दिला होता. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे गाडीची देखभाल-दुरुस्ती करण्यासाठी सहा तासांचा कालावधी आवश्यक असताना कोकण रेल्वे हे काम फक्त चार तासांत पार पाडत होती. त्यामुळे पुरेसा वेळ न मिळाल्याने देखभाल-दुरुस्ती योग्य पद्धतीने होत नव्हती, असे निरीक्षण बक्षी यांनी नोंदवले होते.
मात्र, या आरोपाचा समाचार घेताना कोकण रेल्वे महामंडळाचे चे मुख्य व्यवस्थापकीय अधिकारी भानू तायल यांनी आपली बाजू मांडली आहे. गेल्या काही वर्षांत कोकण रेल्वेने गाडय़ांच्या देखभाल-दुरुस्तीसाठी यंत्रांच्या साहाय्याने नवीन पद्धत विकसित केली आहे. या यंत्रणेनुसार २४ डब्यांची गाडी धुण्यासाठी फक्त ४५ मिनिटांचा अवधी पुरतो. तसेच कामगारांच्या योग्य नियोजनामुळे ही गाडी तपासण्यासाठी आणि दुरुस्तीसाठी पुढील सव्वा ते साडेतीन तास लागतात. त्यामुळे पूर्ण गाडी चार तासांत प्रवासासाठी तयार होते, असे तायल यांनी स्पष्ट केले.
संग्रहित लेख, दिनांक 4th Nov 2015 रोजी प्रकाशित
दिवा-सावंतवाडी अपघात प्रकरण : आम्ही दोषी नाहीच!
कोकण रेल्वेने गाडय़ांच्या देखभाल-दुरुस्तीसाठी यंत्रांच्या साहाय्याने नवीन पद्धत विकसित केली आहे.
Written by झियाऊद्दीन सय्यदझियाउद्दीन सय्यद

First published on: 04-11-2015 at 06:27 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Koknan railway not guilty in diva sawantwadi passenger train accident