मुंबई : धारावी पुनर्विकास प्रकल्पाअंतर्गत अपात्र रहिवाशांच्या पुनर्वसनासाठी धारावी पुनर्विकास प्रकल्पास (डीआरपी) कुर्ला मदर डेअरीची जागा देण्यात आली आहे. पण कुर्लावासियाचा मात्र ही जागा धारावीसाठी देण्यास तीव्र विरोध असून यासाठी त्यांनी जनआंदोलन उभारले आहे. कुर्लावासियांचा विरोध डावलून ही जागा धारावीसाठी देण्यात आल्याने कुर्लावासिय आक्रमक झाले आहेत. आपला आवाज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत पोहचविण्यासाठी कुर्लावासियांनी लोक चळवळीच्या माध्यमातून ७ ऑगस्ट रोजी मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी धडकण्याचा निर्णय घेतला आहे.
त्यानुसार ७ ऑगस्ट रोजी कुर्ला मदर डेअरी ते वर्षा निवासस्थान दरम्यान निवेदन पदयात्रा काढण्यात येणार आहे. यावेळी मुख्यमंत्र्यांना मागण्यांचे निवेदन देऊन कुर्ला मदर डेअरीची जागा धारावीसाठी न देण्याची मागणी केली जाणार आहे.राज्य सरकारने धारावी पुनर्विकास प्रकल्पाअंतर्गत पहिल्यांदाच धारावीतील अपात्र रहिवाशांना घरे देण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र ही घरे धारावीबाहेर विविध ठिकाणी देण्यात येणार आहेत. त्यासाठी डीआरपीने मुंबईतील विविध ठिकाणच्या जागांची मागणी केली होती.
राज्य सरकारने काही एकर जागा धारावीसाठी दिली आहे. यात कुर्ला मदर डेअरीच्या २१ हेक्टर जागेचा समावेश आहे. ही जागा हिरवळीची असल्याने ती धारावीसाठी न देता येथे सार्वजनिक उद्यान उभारावे अशी मागणी कुर्लावासियांनी केली आहे. डीआरपीने या जागेची मागणी केल्यापासूनच कुर्लावासियांचा त्यास विरोध आहे. मात्र तरीही राज्य सरकारने ही जागा धारावीसाठी दिली. राज्य सरकारने आपला निर्णय रद्द करावा या मागणीवर लोक चळवळ, कुर्लावासिय ठाम आहेत. त्यासाठीच आता लोक चळवळीच्या माध्यमातून रहिवाशांनी थेट मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानावर धडकून मुख्यमंत्र्यांची भेट घेण्याचे ठरवले आहे.
मुख्यमंत्री कार्यालयास आतापर्यंत ४५ पत्रे देण्यात आली आहेत. मात्र अद्यापपर्यंत एकाही पत्राची दखल घेण्यात आलेली नाही. त्यामुळे रहिवासी नाराज आहेत. लोक चळवळीच्या माध्यमातून रहिवाशांची २९ जुलै रोजी बैठक झाली. या बैठकीत कुर्ला मदर डेअरी ते वर्षा निवासस्थान अशी १९ किमीची निवेदन पदयात्रा काढण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती लोक चळवळीचे किरण पैलवान यांनी दिली. कुर्ला मदर डेअरी येथून ७ ऑगस्ट रोजी सकाळी ८ वाजता या निवेदन पदयात्रेला सुरुवात होणार आहे. या निवेदन पदयात्रेत मोठ्या संख्येने रहिवाशांनी सहभागी व्हावे, असे आवाहन लोक चळवळीने केले आहे.